मिशन मुंबईसाठी अमित शहा दाखल; पदाधिकाऱ्यांना आज मार्गदर्शन, गणपतीचेही दर्शन घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 06:59 AM2022-09-05T06:59:28+5:302022-09-05T06:59:41+5:30
शिवसेनेत पडलेली फूट आणि राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर अमित शहा मुंबईत येत आहेत. मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर निवडणुका लवकरच होणार आहेत.
मुंबई: केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा रविवारी रात्री मुंबईत पोहोचले. सोमवारी ते भाजपच्या प्रदेश कोअर कमिटीच्या बैठकीत तसेच मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत. मुंबई महापालिकेवर कोणत्याही परिस्थितीत भाजपचा झेंडा फडकविण्यासाठीचा कानमंत्र ते देतील, असे म्हटले जाते.
शिवसेनेत पडलेली फूट आणि राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर अमित शहा मुंबईत येत आहेत. मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर निवडणुका लवकरच होणार आहेत. ते सकाळी लालबागच्या गणपतीचे आणि नंतर मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात गणरायाचे दर्शन घेतील. तेथून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यातील गणरायाचे दर्शन घेतील आणि मेघदूत बंगल्यात भाजप प्रदेश कोअर कमिटीच्या बैठकीत मार्गदर्शन करतील. फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कोअर कमिटीचे सदस्य बैठकीला उपस्थित राहतील. त्यानंतर वर्षा बंगल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणपतीचे दर्शन घेतील आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील. त्यानंतर ते पवईला रवाना होतील. तिथे आयोजित ए. एम. नाईक शाळेचे उद्घाटन करतील आणि नंतर दिल्लीला रवाना होणार आहेत.