Join us  

अमित शाह उद्या मुंबई दौऱ्यावर! कुटुंबासह लालबागच्या राजाचे दर्शन घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 7:30 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या शनिवारी कुटुंबासह मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेणार आहेत. गृहमंत्र्यांच्या प्रस्तावित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर लालबाग आणि परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. यानंतर शाह भाजप नेते आशिष शेलार, मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी दुपारी ३.३० वाजता लालबागच्या राजाचे दर्शन घेणार आहेत. शाह २५ मिनिटे लालबागच्या राजाच्या दरबारात असतील. 

दक्षिणेतील मोठा पक्ष भाजपासोबत, अमित शाह यांच्या भेटीनंतर NDA प्रवेश पक्का, 'इंडिया'ला धक्का

या पार्श्वभूमीवर केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. यानंतर अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन श्रीगणेशाचे दर्शन घेणार आहेत. यानंतर शाह भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी जाऊन गणेशाची पूजा करणार आहेत. संध्याकाळी मुंबईत आयोजित कार्यक्रमात सहभागी होऊन ते दिल्लीला परतणार आहेत.

दक्षिणेतील मोठा पक्ष भाजपासोबत

२०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी काही महिन्यांचा कालावधी उरला आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सत्ताधारी भाजपाला रोखण्यासाठी देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी एकजुट दाखवली असून 'इंडिया' या आघाडीची स्थापना केली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. अशातच कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) औपचारिकपणे सामील झाले. या बैठकीला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत देखील उपस्थित होते.

दरम्यान, जेडीएस पक्ष सत्ताधारी एनडीएमध्ये विलीन झाल्यानंतर भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, मला आनंद वाटतो की, जेडी(एस) ने राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग होण्याचा निर्णय घेतला आहे. एनडीएमध्ये आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करतो. त्यांच्या प्रवेशामुळे एनडीए आणि पंतप्रधान मोदींच्या न्यू इंडिया, सशक्त भारताच्या व्हिजनला आणखी बळ मिळणार आहे.

टॅग्स :अमित शाहभाजपामुंबई