अमित शाह यांनी लोकशाहीमध्ये विरोधकांचा सन्मान करायला शिकावे - संजय निरुपम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 08:50 PM2018-04-06T20:50:17+5:302018-04-06T20:50:17+5:30
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे भाजपच्या स्थापनदिना निमित्त मुंबईत कार्यक्रमासाठी आले होते, त्यामुळे मुंबईतील जनतेला प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागला. संपूर्ण मुंबईभर ट्रॅफिकची महाभयंकर समस्या निर्माण झाली होती. मुंबईत ६ ते ७ तास ट्रॅफिक जाम झाले होते. मुंबईतील जनतेला ऑफिसला पोहोचायला खूप उशीर झाला होता. भाजप सरकार सत्तेत आहे याचा फायदा घेत या कार्यक्रमासाठी अत्यंत वाईट नियोजन केले होते, सत्तेचा दुरुपयोग केला होता. मुंबईतील जनता भाजप सरकारवर अत्यंत नाराज झालेली आहे. काही दिवसांपूर्वीच हजारो शेतकर्त्यांनी नियोजनबद्ध मोर्चा नाशिक ते विधानभवन काढला होता, त्यावेळी मुंबईत कोणालाही त्रास झाला नाही तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षा असून हि त्यांना हि कोणताच त्रास होऊ दिला नाही. ट्रॅफिक जाम होऊ दिले नाही, अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध मोर्चा काढला आणि दुसरीकडे भाजप सरकारने मात्र संपूर्ण मुंबईला वेठीस धरले. त्यांच्या कार्यक्रमासाठी लोकांना त्रास दिला. भाजपने शेतकऱ्यांकडून खूप काही शिकले पाहिजे, असे उद्गार मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी काढले.
संजय निरुपम पुढे म्हणाले कि अमित शाह यांनी जे भाषण केले त्यांमध्ये ते अनेक गोष्टी खोटे बोललेले आहेत. अमित शाह यांनी खोटे बोलून जनतेची दिशाभूल करू नये. ते म्हणाले कि काँग्रेसच्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे भाव जास्त होते, परंतु वास्तव असे आहे कि काँग्रेसचे सरकार असताना कधीच पेट्रोल ८२ रुपये आणि डिझेल ७० रुपये लिटर कधीच नव्हते. हे फक्त भाजपच्या काळात झालेले आहे. देशात सर्वात महाग पेट्रोल व डिझेल मुंबईमध्ये मिळत आहे, हे भाजपचेच कृपा आहे. अमित शाह यांना खोटे बोलायची सवयच आहे. ते धादांत खोटे बोलत आहेत. भाजपाला खोट्या बातम्या पसरवून लोकांची दिशाभूल करण्याची सवयच आहे.
संजय निरुपम पुढे म्हणाले कि अमित शाह यांनी आपल्या भाषणामध्ये विरोधकांना जनावरांची उपमा दिली हे अतिशय निंदनीय आहे आणि मी याचा निषेध करतो. देशाच्या लोकशाहीमध्ये अमित शाह यांनी विरोधकांचा सन्मान करायला शिकले पाहिजे. त्यांनी अतिशय हीन आणि खालच्या पातळीवरची भाषा वापरलेली आहे. अमित शाह म्हणाले कि येत्या निवडणुकीमध्ये भाजपाला ठरविण्यासाठी देशातील सर्व विरोधक एकत्र येत आहेत, त्यासाठी त्यांनी एक गोष्ट सांगितली त्यामध्ये त्यांनी नरेंद्र मोदी यांना बाढ (पूर आलेली मोठी नदी) म्हटले आहे आणि बाढ आल्यामुळे एका वृक्षावर सर्व जनावर जीव वाचविण्यासाठी चढतात, म्हणजेच विरोधकांना जनावरांची उपमा त्यांनी दिली. हे अतिशय निंदनीय आणि आक्षेपार्ह्य आहे. पण एक गोष्ट खरी आहे कि नरेंद्र मोदी हे बाढच आहेत, ते देशाला बुडवायला निघालेले आहेत.
संजय निरुपम पुढे म्हणाले कि अमित शाह म्हणाले कि भाजप सरकार जिथे जिथे आहे तिथे तिथे सुशासन सुरु आहे, पारदर्शी कारभार सुरु आहे, भ्रष्टाचार कोठे हि होत नाही आहे. पण मी त्यांना आठवण करू देऊ इच्छितो कि महाराष्ट्रातच भाजपाच्या १६ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे खटले सुरु आहेत. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रालयातील उंदीर घोटाळा आणि मुख्यमंत्री कार्यालयातील चहा घोटाळा या विषयी काहीच उत्तर देऊ शकत नाही आहेत. हेच का ह्यांचे पारदर्शी सरकार ? भाजप सरकार आणि बिल्डर यांच्या युतीमुळे भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. यालाच अमित शाह सुशासन म्हणत आहेत काय ? असा माझा सवाल आहे.