Join us

Amit Shah Mumbai Tweet: "एकनाथजी आणि देवेंद्रजींची जोडी..."; मुंबई दौरा संपताच अमित शाहांचे सूचक ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2022 7:41 PM

अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर होते.

Amit Shah Mumbai Tweet: देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित मुंबई दौरा आज पार पडला. काल रात्री मुंबई दाखल झालेल्या अमित शाह यांनी आज शहरातील निवडक गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागचा राजा गणरायाच्या दर्शनाने त्यांनी दौऱ्याची सुरूवात केली. त्यानंतर वर्षा येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या घरातील गणरायाचे आणि सागर बंगल्यावरील देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या घरातील गणरायाचे अमित शाह यांनी दर्शन घेतले. या दौऱ्यामध्ये अमित शाह यांनी मुंबईत भाजपाच्या नेते, मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत, 'उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आपल्याला दगा दिला आणि शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला', असे थेट मत व्यक्त केले. त्यानंतर, अमित शाह यांनी मुंबई दौरा संपताच एक सूचक ट्विट केले.

"मुंबईत भाजपा खासदार, आमदार आणि नगरसेवक यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ही जोडी जनतेच्या हितासाठी समर्पित वृत्तीने काम करत आहेत, जनता NDA सोबत आहे. मला विश्वास आहे की आगामी BMC निवडणुकीत NDA प्रचंड बहुमताने विजयी होईल", असं सूचक ट्विट अमित शाह यांनी केले.

उद्धव ठाकरेंनी आधी भाजपाला, नंतर जनतेला धोका दिला!

"तुम्हाला माहिती आहे, उद्धव ठाकरेंनी आपल्याला दगा दिला. शिवसेनेनं पाठीत खंजीर खुपसलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा. भाजपने कधीच छोटा भाऊ-मोठा भाऊ म्हटले नाही. राजकारणात काहीही करा, पण धोका सहन करु नका. जे दगा देतात त्यांना योग्य शिक्षा झालीच पाहिजे. प्रत्येक कार्यकर्ता मैदानात उतरला पाहिजे. तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर, नेते देवेंद्र फडणवीसांच्या कामावर मतं मागितली आणि जिंकून आले. त्यानंतर तुम्ही जनतेचा विश्वासघात केला. मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपचे असावे. उद्धव ठाकरेंनी केवळ दोन जागांसाठी २०१४ मध्ये आपल्यासोबतची युती तोडली. ते खयाली पुलाव पकवत होते. त्यांना वाटलेलं भाजपा युती तोडणार नाही. आपल्याशिवाय भाजपाचं काय होणार, आपल्याच जास्त जागा जिंकून येतील, असा त्यांचा समज होता. जो चुकीचा ठरला", असा टोला अमित शाहांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

टॅग्स :अमित शाहएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरे