अमित शाह मुंबईत; एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांशी बंद दाराआड चर्चा, तर्क-वितर्कांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 06:18 PM2023-09-23T18:18:27+5:302023-09-23T18:22:31+5:30
Amit Shah Mumbai Visit: मुंबई दौऱ्यावर आलेल्या अमित शाहांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले.
Amit Shah Mumbai Visit: देशभरात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत आले असून, लालबाग राजा चरणी नतमस्तक झाले. यानंतर अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी अमित शाह यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बंद दाराआड चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई दौऱ्यात सर्वप्रथम भाजप नेते आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते लालबागच्या राजाच्या चरणी लीन झाल्याचे पाहायला मिळाले. अमित शाह देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गेले. याठिकाणी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बंद दाराआड चर्चा केल्याचे समजते. आमदार अपात्रतासंदर्भात ही चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे.
आमदार अपात्रतेची सुनावणी अन् अमित शाहांचा मुंबई दौरा
महाराष्ट्रात आमदार अपात्रतेचा मुद्दा गाजत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणी सोमवारी सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापार्श्वभूमीवर अमित शाह यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारले होते. अधिक वेळ न घेण्याची सूचना केली होती. त्यानंतर राहुल नार्वेकर यांनी दिल्लीमध्ये जाऊन कायदेतज्ज्ञांची भेट घेतली होती.
दरम्यान, अमित शाह यांनी सपत्नीक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी शाह यांचे स्वागत केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री दीपक केसरकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार आशिष शेलार, खासदार मनोज कोटक, खासदार पूनम महाजन हे उपस्थित होते. अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला.