मुंबई : मुंबईच्या गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत (ShivSena Sanjay Raut) यांना आज पुन्हा एकदा ED च्या विशेष PMLA न्यायालयाने धक्का दिला. आज कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्यांना 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीतच ठेवण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे एकीकडे संजय राऊत आज न्यायालयात जाण्यासाठी तुरुंगातून बाहेर पडले तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेही मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यामुळे, शहा-राऊत यांच्या मुंबईतील फोटोंची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा रविवारी रात्री मुंबईत पोहोचले. सोमवारी ते भाजपच्या प्रदेश कोअर कमिटीच्या बैठकीत त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. तसेच, मुंबई महापालिकेवर कोणत्याही परिस्थितीत भाजपचा झेंडा फडकविण्यासाठीचा कानमंत्रही दिला. मुंबई महापालिकेसाठी मिशन १५० चं टार्गेट अमित शहा यांनी दिलं. दरम्यान, अमित शहांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन बाप्पांचे दर्शनही घेतले. तत्पूर्वी, मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन ते आशिष शेलार यांच्याही घरी गेले होते.
मुंबईत अमित शहांचा दौरा आणि दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांची न्यायालयात सुनावणी असल्याने मुंबईत आज या दोन नेत्यांची चांगलीच चर्चा होत आहे. दरम्यान, संजय राऊत यांचा कोठडीतील मुक्काम आणखी वाढला असून न्यायालयाने त्यांना १९ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. दुसरीकडे भाजप पदाधिकाऱ्यांसमवेत अमित शहांनी बैठक घेऊन मिशन मुंबई महापालिकेचं रणशिंग फुंकले आहे. दरम्यान, अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यामुळे भाजप नेत्यांमध्ये उत्साह वाढला आहे अमित शहांचं ट्विट
"गणेशोत्सवादरम्यान मुंबईत असणं हा एक विशेष अनुभव आहे. आज मुंबईत लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन त्यानंतर वांद्रे पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी होईन. शिक्षक दिनानिमित्त दुपारी पवईत नाइक चॅरिटेबल ट्रस्टच्या ए एम नाइक विद्यालयाचे उद्घाटन होईल", असं अमित शाह ट्विटमध्ये म्हणाले.