Join us

'राज'कारणात नवा ठाकरे; अमित यांना रिंगणात उतरवण्याची मनसे मेळाव्यात मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 9:09 PM

तरुणांना आकर्षित करण्यासाठी अमित ठाकरेंना मैदानात आणण्याची मागणी

मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे लवकरच राजकीय व्यासपीठावर दिसणाऱ्याची शक्यता आहे. तरुणांना पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी अमित ठाकरेंना राजकीय आखाड्यात उतरवलं जावं, अशी शिफारस मनसेचे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी मनसेच्या बैठकीत केली. त्यामुळे मनसेच्या आगामी कार्यक्रमांमध्ये अमित ठाकरे व्यासपीठावर दिसू शकतात. लोकसभा, विधानसभा आणि पालिका निवडणुकांमध्ये मनसेची कामगिरी अतिशय निराशाजनक झाली आहे. सुरुवातीला तरुणांमध्ये राज ठाकरेंची मोठा क्रेझ होती. मात्र आता मनसेचे बुरे दिन सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकांची रणनिती ठरवण्यासाठी आज राज ठाकरेंनी पक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये बाळा नांदगावकर यांनी अमित ठाकरेंनी पक्षात सक्रीय व्हावं, असं मत राज यांच्याकडे व्यक्त केलं. तरुणांना आकर्षित करण्यात अमित ठाकरे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असंही नांदगावकर म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहेत. आदित्य यांच्याकडे युवासेनेची जबाबदारी आहे. विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये निवडणुकांमध्ये आदित्य यांनी युवासेनेला चांगलं यश मिळवून दिलं. याचप्रमाणे मनसेकडून अमित ठाकरेंना राजकीय आखाड्यात उतरवलं जाऊ शकतं. लोकसभा निवडणुकीला एक वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला असल्यानं अमित ठाकरे राजकारणात सक्रीय होऊ शकतात. अचूक टायमिंगसाठी ओळखले जाणारे राज ठाकरे त्यांच्या मुलाला कधी राजकारणात आणणार, याकडे राजकीय वर्तुळातील अनेकांचं लक्ष लागलं आहे.  

टॅग्स :राज ठाकरेअमित ठाकरेमनसेशिवसेनाउद्धव ठाकरेआदित्य ठाकरे