दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 11:47 AM2024-11-18T11:47:42+5:302024-11-18T11:49:14+5:30
Amit Thackeray in Mahim Constituency, Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: माहीम मतदारसंघात शिवसेना शिंदे गट, शिवसेना उबाठा आणि मनसे अशी तिरंगी लढत आहे
Amit Thackeray in Mahim Constituency, Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्रातील सर्व पक्ष्यांच्या उमेदवारांचे चित्र ज्यावेळी स्पष्ट झाले, त्या दिवसापासून राज्यभरात एका विधानसभा मतदारसंघाची तुफान चर्चा सुरु आहे. दादर-माहीम मधील विधानसभेत यावेळी तिरंगी लढत आहे. मनसेकडून राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे, शिवसेना महायुतीकडून सदा सरवणकर आणि मविआ ठाकरे गटाचे महेश सावंत असे तीन उमेदवार या विधानसभा मतदारसंघातून रिंगणात आहेत. माहीमचे विद्यमान आमदार सदा सरवणकर हे गेली १० वर्षे या विभागातून आमदार आहेत, तर ठाकरे गटाची या विभागात चांगली ताकद आहे. अशा परिस्थितीत यंदाची निवडणूक अटीतटीची होणार की एकतर्फी होणार? यावर अमित ठाकरे यांनी उत्तर दिले.
"जनतेला बदल हवाय, लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे, प्रचंड जनसमुदाय माझ्या पक्ष्याच्या समर्थनासाठी रॅलीत सहभागी झाला आहे. त्यामुळे मला तर ही रॅली म्हणजे निवडणुकीनंतरची विजयी मिरवणुकच वाटते आहे. लोकांकडून मिळणारा प्रतिसाद उत्स्फूर्त आणि उत्तम आहे. या लोकांच्या कृपेने मी आमदार झाल्यावर जे प्रश्न झटपट सोडवता येतील ते मी नक्कीच सोडवेन. मी तुम्हाला सांगतो की ही निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी होईल हे पूर्णपणे जनतेवर अवलंबून आहे. मी माझ्याबाजूने १०० टक्के प्रयत्न करतोय पण जो प्रतिसाद मिळतोय त्यावरून मी विजयी होईन असा विश्वास आहे. पुढच्या पाच वर्षांनी तुम्ही माझ्याशी पुन्हा बोलायला याल, तेव्हा मी आमदार म्हणून योग्य ती सर्व कामे केलेली असतील", अशा शब्दांत अमित ठाकरेंनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, माहीम मतदारसंघात महायुतीतील भाजपाने मनसे उमेदवार अमित ठाकरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार म्हणून सदा सरवणकर हे देखील रिंगणात आहे. अशी दुहेरी भूमिका का घ्यावी लागली असावी, याबाबत भाजपाने स्पष्टीकरण दिले आहे. माहीममधून अमित ठाकरेंचे नाव आधी जाहीर झाल्याने सदा सरवणकर यांना माघार घेण्याची विनंती केली गेली होती, पण त्यांनी माघार घेतल्यास शिवसेनेची ती मते महाविकास आघाडीच्या शिवसेना-उबाठा गटाला जातील, असे सरवणकर यांनी शिंदे यांना पटवून दिले. त्यानंतर अमित ठाकरे यांनाही निवडणुकीतून माघार घेऊन विधान परिषदे देण्याची ऑफर दिली होती. पण तेदेखील निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याने असा पेच निर्माण झाला, असे भाजपाचे ज्येष्ठ नेते उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी एका मुलाखतीत सांगितले.