अमित ठाकरे प्रभादेवी मंदिरात करणार महाआरती, उद्या राज्यभर मनसे साजरी करणार अक्षय तृतीया!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 10:27 AM2022-05-02T10:27:59+5:302022-05-02T10:39:33+5:30
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजे ३ मे रोजी राज्यभरातील मंदिरांमध्ये महाआरती करण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (मनसे) घेतला आहे.
मुंबई-
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजे ३ मे रोजी राज्यभरातील मंदिरांमध्ये महाआरती करण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (मनसे) घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना याबाबतचे आदेश दिले आहेत. यानुसार आता राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे मुंबईतील प्रभादेवी मंदिरात उद्या महाआरती करणार असल्याची माहिती समोर आली आहे. महत्वाची बाब म्हणजे उद्या ईदही आहे. त्यात मनसैनिकांकडून मंदिरांमध्ये महाआरती करण्यासाठीची परवानगी पोलिसांकडे मागण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांची दमछाक होणार आहे.
राज ठाकरे यांनी काल १ मे महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये घेतलेल्या सभेत मशिदीवरील भोंग्यांचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित करत ३ मेचा अल्टिमेटम दिला आहे. ३ मेपर्यंत मशिदीवरील लाऊडस्पीकर आणि भोंगे उतरले नाहीत तर ४ मेपासून मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवली जाईल, असा इशारा राज ठाकर यांनी दिला आहे. त्यातच आता उद्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर राज्यातील पक्ष कार्यकर्त्यांना मंदिरांमध्ये महाआरतीचं आयोजन करण्याच्या सूचना राज ठाकरेंनी दिल्या आहेत.
लाऊडस्पीकर हा सामाजिक विषय आहे. शांतता बिघडवण्याची माझी इच्छा नाही. सर्व लाऊडस्पीकर अनधिकृत असून उत्तर प्रदेशातील लाऊडस्पीकर उतरू शकतात, तर महाराष्ट्रातही उतरले पाहिजेत. आज एक तारीख, उद्या दोन, तीन ईद. पण चार मे नंतर ऐकणार नाही, असा इशारा देत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भोंगे उतरविण्यासाठी तीन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.
मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील विराट सभेत बोलताना राज यांनी औरंगाबादेतच नाही तर मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात, नंतर उत्तर व पश्चिम महाराष्ट्र व पुढे कोकणात अशा सभा घेणार असल्याचे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टीकेचे लक्ष्य करीत राज्यात जातीय विष कालवू नका, असे आवाहन केले. शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना अनुल्लेखांनी मारत शहरातील आठ दिवसांनी होणाऱ्या पाणीपुरवठ्यावरदेखील बोट ठेवले.