...अन् ठाकरे बंधू एकत्र आलेच, भाजपा टार्गेटवर; अमित ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 02:07 PM2023-08-18T14:07:01+5:302023-08-18T14:08:51+5:30

त्याचा अर्थ दिल्लीतील सत्ताधीशांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्यांना लोकशाही गाडून हुकुमशाहीनेच कारभार हाकायचा आहे हे स्पष्ट आहे असा आरोप अमित ठाकरेंनी केला.

Amit Thackeray's letter to Governor on Senate election, indirectly targeted at BJP | ...अन् ठाकरे बंधू एकत्र आलेच, भाजपा टार्गेटवर; अमित ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

...अन् ठाकरे बंधू एकत्र आलेच, भाजपा टार्गेटवर; अमित ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

googlenewsNext

मुंबई – विद्यापीठाची सिनेट निवडणूक अचानक पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आदित्य ठाकरेंनंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी या प्रकरणी थेट राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहिलं आहे. विद्यापीठाची निवडणूक पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करणं अत्यंत धक्कादायक आणि अशोभनीय आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

राज्यपाल रमेश बैस यांना लिहिलेल्या पत्रात अमित ठाकरे म्हणतात की, ही निवडणूक लढवू इच्छिणारे १८ ऑगस्ट सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करणार होते, मात्र केवळ १२ तास आधी रात्री ११ च्या सुमारास विद्यापीठाचे प्रभारी, कुलसचिव सुनील भिरूड यांनी शासन पत्राचा संदर्भ देत निवडणूक स्थगित केल्याचे जाहीर केले. अत्यंत संतापजनक बाब म्हणजे नेमक्या कोणत्या कारणाने निवडणूक रद्द करण्यात आली हे नमूद करण्याची पारदर्शकता दाखवणेही विद्यापीठाच्या कुलसचिवांना गरजेचे वाटले नाही असं त्यांनी सांगितले.

तसेच राजकीय-सामजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सुशिक्षितांसाठी सिनेट निवडणूक ही व्यवस्थेत प्रवेश करण्याची पहिली पायरी असते. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेसह इतरही अनेक विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी या निवडणुकीच्या माध्यमातून विद्यापीठाच्या कारभाराबाबत तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या गंभीर समस्यांबाबत काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करत होते. मात्र या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या केवळ १२ तास अगोदर ही निवडणूक स्थगित केली. त्यामुळे ९५ हजार पदवीधरांच्या मनात एक वेगळीच शंका उपस्थित झाली आहे. मुंबई विद्यापीठाचे प्रशासन नेमकं कुणाला घाबरत आहे? असा सवाल अमित ठाकरेंनी उपस्थित केला.

दरम्यान, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्या सोयीने सातत्याने पुढे ढकलणारे राज्याचे सत्ताधारी आता सिनेट निवडणुकाही वेळेवर होऊ देणार नसतील तर त्याचा अर्थ दिल्लीतील सत्ताधीशांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्यांना लोकशाही गाडून हुकुमशाहीनेच कारभार हाकायचा आहे हे स्पष्ट आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुंबई विद्यापीठाचे पदसिद्ध कुलपती म्हणून आपण या अतिसंवेदनशील प्रकरणात जातीने लक्ष घालावे आणि सिनेट निवडणूक कोणत्या कारणाने रातोरात स्थगित करण्यात आली हे स्पष्ट करावे अशी मागणी अमित ठाकरेंनी केली. तसेच सिनेट निवडणूक रद्द करण्यासाठी आज ‘पहाटे’चा मुहूर्त निश्चित केला नाही यासाठी कुलपतींचे आभार असा खोचक टोलाही अमित ठाकरेंनी नाव न घेता भाजपाला लगावला आहे.

Web Title: Amit Thackeray's letter to Governor on Senate election, indirectly targeted at BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.