विरोधकांशी लढून अमितला निवडून आणणारच; मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 05:52 AM2024-11-11T05:52:46+5:302024-11-11T05:55:00+5:30

अमित ठाकरे यांच्यासाठी ही एकच सभा घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. 

Amit will be elected by fighting against the opposition says raj thackeray | विरोधकांशी लढून अमितला निवडून आणणारच; मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भूमिका

विरोधकांशी लढून अमितला निवडून आणणारच; मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार दिला नाही. भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला त्यावेळी भविष्यात त्यांनी अमितविरोधात उमेदवार देऊ नये, अशी माझी अपेक्षा नव्हती. अमितविरोधात जे समोर आहेत, त्यांच्याविरोधात लढून अमितला निवडून आणणारच, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी जाहीर केली. 

मनसे उमेदवार अमित ठाकरे यांच्या प्रचारासाठी प्रभादेवी येथे आयोजित जाहीर सभेत राज ठाकरे यांनी उद्धवसेना आणि शिंदेसेनेचा समाचार घेतला. तसेच ठाकरे कुटुंबाचा वारसा सांगून अमित यांना मतदान करण्याचे भावनिक आवाहनही त्यांनी केले.  उद्धव ठाकरे आजारी होते तेव्हा मला बाळासाहेबांचा फोन आला. मी गाडी घेऊन प्रथम बाहेर पडलो. मी परिवाराआडून राजकारण केले नाही. वरळीत मनसेची ३७ हजार मते आहेत. आदित्य ठाकरे उभा होता तेव्हा आमच्या कुटुंबातील पहिला व्यक्ती उभा राहत असल्याने मी उमेदवार दिला नाही. हे माझ्या मनातून आले होते. पुढच्या वेळी मला सांभाळून घ्या म्हणून मी कोणाला फोन केला नाही, असेही राज ठाकरे यांनी नमूद केले.

भावनिक साद
दादर, माहीम, प्रभादेवी परिसरात मार्मिक, सामना, शिवसेना यांची सुरुवात झाली. अनेकांना निवडून आणले. आमच्या ठाकरेंच्या प्रवासाची माहीम ही भूमी आहे. आमच्या तीन पिढ्या राज्यात प्रबोधन करण्यात, लिहिण्यात, व्यंगचित्र काढण्यात गेल्या आहेत. आज या मतदारसंघात पहिल्यांदा एक ठाकरे उभा राहत आहे, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी  मतदारांना भावनिक साद घातली. तसेच अमित ठाकरे यांच्यासाठी ही एकच सभा घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. 

सरवणकर, सावंतांवर टीका
बाळासाहेब हयात असताना सरवणकर काँग्रेसमध्ये गेले. तेथून परत आले. शिंदे यांच्या बंडानंतर आधी शिंदे यांना शिव्या दिल्या, नंतर शिंदे यांच्याबरोबर गेले. सावंत हेही काँग्रेसकडून नगरसेवकपदासाठी उभे होते. तिकडे पडल्यावर माघारी आले, अशीही टीका राज यांनी केली. अमित राज ठाकरे असे त्याचे नाव असले तरी अमितला भेटण्यासाठी कोणालाही पूर्वपरवानगीची गरज पडणार नाही. तो चोवीस तास उपलब्ध असेल, असेही राज ठाकरे म्हणाले.

Web Title: Amit will be elected by fighting against the opposition says raj thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.