Join us

10 लाख रूपयांना विकला गेला अमिताभ बच्चन यांचा निळा हत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 10:19 AM

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा निळा हत्ती दहा लाख रूपयांना विकला गेला आहे.

मुंबई- बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा निळा हत्ती दहा लाख रूपयांना विकला गेला आहे. मुंबईमध्ये गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला एलिफंट परेडचा शनिवारी रात्री लिलाव झाला. यामध्ये अमिताभ बच्चन यांच्या निळ्या हत्तीला तब्बल दहा लाख रूपयांची बोली लागली. हत्तींच्या रंगीबेरंगी प्रतिकृती असलेलं हे प्रदर्शन गेटवे ऑफ इंडियापासून सुरू होऊन प्रियदर्शनी पार्क, वरळी सी फेस, वांद्रे कोर्ट अशा विविध भागात आयोजीत करण्यात आलं होतं. हत्तीचं हे प्रदर्शन लोकांच्याही आकर्षणाचा केंद्र ठरलं होतं. 

प्रदर्शनात ठेवलेले पाच फुट उंचीचे हत्ती अनेक कलाकारांनी, चित्रकारांनी, शिल्पकारांनी तसंच फॅशन डिझायनर्सनी साकारले होते. सिने कलाकारांचाही यात सहभाग होता. प्रत्येकाने आपापल्या कल्पनेनुसार लाल, गुलाबी, हिरव्या व पिवळ्या रंगाच्या हत्तीच्या प्रतिकृती साकारल्या  होत्या.

हत्तीच्या संरक्षणासाठी गठीत एलिफंट फॅमिलीच्या अधिकाऱ्यांनी अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याकडे प्रदर्शनात त्यांचाही हत्ती ठेवण्याचा आग्रह केला होता. प्रदर्शनात असलेल्या 101 हत्तीपैंकी एक हत्ती बीग बींनी साकारलेला असावा असा आयोजकांचा आग्रह होता. म्हणूनच अमिताभ बच्चन यांनी निळ्या रंगाची हत्तीची प्रतिकृती प्रदर्शनात ठेवली. त्यावर फुल-पानांची चित्र काढण्यात आली होती. इतकंच नाही, तर हरिवंश राय बच्चन यांनी लहान मुलांसाठी लिहिलेली कविताही त्या हत्तीच्या प्रतिकृतीवर लिहिण्यात आली होती.  

टॅग्स :अमिताभ बच्चन