Join us

कूपर रुग्णालयात कचऱ्यातून फुलवलेल्या फार्म हाऊसचं बिग बींकडून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2018 7:59 PM

रुग्णालय परिसरातील दीड हजार चौरस मीटरवर फार्म हाऊस

मुंबई: कूपर रुग्णालय परिसरात कचऱ्यातून फुलवण्यात आलेल्या हिरव्यागार फार्म हाऊसचं बिग बी अमिताभ बच्चन यांनी तोंडभरुन कौतुक केलं आहे. याठिकाणी ओला आणि सुक्या कचऱ्याचं वर्गीकरण करुन त्याचा वापर गांडूळ खत तयार करण्यासाठी करण्यात आला. या माध्यमातून आता कूपर रुग्णालय परिसरात दीड हजार चौरस मीटरवर फार्म हाऊस उभं राहिलं आहे. स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाचे प्रमुख समन्वय अधिकारी सुभाष दळवी यांच्या संकल्पनेतून कूपर रुग्णालय परिसरात नंदनवन फुललं आहे. बचत गटातील महिला, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने या जागेचा कायापालट झाला असून या ठिकाणी सुंदर फार्महाऊस साकारलं आहे. एका चित्रवाहिनीच्या कार्यक्रमासाठी आलेल्या सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी या प्रकल्पाला काल सकाळी भेट दिली आणि या प्रकल्पाचे कौतुक केलं. बिग बी हे स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड अँम्बेसेडर आहेत. स्वच्छ भारत अभियान ही गरज असल्यानं मी यामध्ये सहभाग घेतो. हे अभियान समाजासाठी गरजेचं असल्याचं अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.सुभाष दळवी यांनी अमिताभ यांना कूपर रुग्णालयातील प्रकल्प समजावून सांगितला. 'स्मार्ट व्हर्मी कंपोस्ट सिस्टीम आणि ऑरगॅनिक फार्मिंगद्वारे कूपर हॉस्पिटलच्या उपहारगृहामधून  रोज जमा होणाऱ्या 150  कचऱ्यातून सुमारे 7 ते 9  किलो आणि महिन्याला सरासरी 200 किलो खत मिळते. या खताचा उपयोग करून येथे फळाफुलांचा मळा फुलला आहे. केळीचा घड, पेरू, ताजी वांगी, मोठा भोपळा, रताळी, काजूची बोंडं यांच्यासह तमालपत्र, मिरे, दालचिनीसारख्या मसाल्याची सुमारे 200 झाडेदेखील या ठिकाणी आहेत. श्रीआस्था बचत गटातील महिलांनी आणि येथील कर्मचाऱ्यांनी या खताचा वापर करून येथे हिरवागार मळा फुलवला,' अशी माहिती दळवी यांनी दिली.  

टॅग्स :अमिताभ बच्चन