Join us

अमिताभ बच्चन यांच्या सहकाऱ्याचा फोन हरवला, स्टेशनवरील हमालाला सापडला, त्यानंतर घडलं असं काही 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 5:31 PM

Amitabh Bachchan: दररोज हमाली करून कसाबसा उदरनिर्वाह करणाऱ्या या हमालाला लाखो रुपयांचा फोन सापडला.

मुंबईतील दादर रेल्वे स्टेशनवर दररोज सगळे मिळून ३०० रुपये कमावणाऱ्या एका हमालाने प्रामाणिकपणाचं उदाहरण सर्वांसमोर ठेवलं आहे. दररोज हमाली करून कसाबसा उदरनिर्वाह करणाऱ्या या हमालाला लाखो रुपयांचा फोन सापडला. मात्र एवढा किमती फोन सापडल्यानंतरही या गरीब हमालाच्या मनात मोह निर्माण झाला नाही. त्याने तो फोन स्वत:जवळ प्रामाणिकपणे मूळ मालकाकडे परत केला. ही संपूर्ण घटना बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित आहेत.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार अमितभ बच्चन यांचे मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत यांचा १ लाख ४० हजार रुपये किमतीचा फोन हरवला होता. हा फोन दादर स्टेशनवर रात्रपाळी करत असलेला दशरथ नावाच्या हमालाला सापडला. त्याने प्रामाणिकपणा दाखवत हा फोन जमा केला. त्यानंतर दीपक यांच्या भावाने येऊन हा फोन ताब्यात घेतला.

हमालाने दाखवलेल्या या प्रामाणिकपणाचं दादर स्टेशन रेल्वे पोलिसांनी कौतुक केलं आहे. तसेच मेकअप आर्टिस्ट दीपक यांनी या हमालाचा सत्कार करण्याचा विचारही बोलून दाखवला आहे. या घटनेची आता खूप चर्चा होत आहे. गेल्या सोमवारी रात्री ११.४० च्या सुमारास दशरथ हा एका प्रवाशाचं सामान ट्रेनमध्ये पोहोचवून आपलं काम संपवत होता. त्याचदरम्यान, त्याने सिटिंग एरियामध्ये एक फोन पडलेला पाहिला. त्यांनी तो फोन उसलला आणि तिथे असलेल्या लोकांकडे विचारणा केली. मात्र सर्वांनी तो फोन त्यांचा नसल्याचे सांगितले.

त्यानंतर या हमालाने थेट दादर जीआरपी पोलीस चौकी गाठली. तिथे तो फोन जमा केला. त्यानंतरा काही वेळातच पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला बोलावून घेतले. फोनच्या मालकाची माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस विभाग आणि सावंत यांनी या हमालाचं कौतुक केलं. दीपक सावंत हे गेल्या अनेक वर्षांपासून अमिताभ बच्चन यांचे मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत आहेत. 

टॅग्स :मोबाइलरेल्वेअमिताभ बच्चनमुंबई