अमिताभ बच्चन यांचे "सरकार" सुसाट

By admin | Published: May 13, 2017 12:34 AM2017-05-13T00:34:44+5:302017-05-13T00:41:57+5:30

सरकार, सरकारराज या चित्रपटाच्या यशानंतर प्रेक्षक आतुरतेने सरकार ३ची वाट पाहात होते. अमिताभ बच्चन आणि राम गोपाल वर्मा

Amitabh Bachchan's "Govt." | अमिताभ बच्चन यांचे "सरकार" सुसाट

अमिताभ बच्चन यांचे "सरकार" सुसाट

Next

सरकार, सरकारराज या चित्रपटाच्या यशानंतर प्रेक्षक आतुरतेने सरकार ३ची वाट पाहात होते. अमिताभ बच्चन आणि राम गोपाल वर्मा यांच्या जोडीने सरकार ३ प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. या चित्रपटामध्येदेखील सुभाष नागरे (अमिताभ बच्चन) यांचा तोच रुबाब आपल्याला पाहायला मिळतो. चित्रपटाच्या सुरुवातीलाच सुभाष नागरे म्हणजेच सरकार त्यांच्या खास छबीत लोकांशी संवाद साधताना आपल्याला दिसतात. या दृश्यातील नागरे यांच्या हातातील रुद्राक्षाच्या माळा आणि लोकांशी संवाद साधताना दोन्ही कंबरेवरती त्यांचा असलेला हात हे पाहून महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ दिवंगत नेत्याची आठवण नक्कीच येते.
सरकार ३ या चित्रपटात आपल्या जवळचे कोण आणि आपल्याशी दगा कोण करतेय या द्विधा मनस्थितीत अडकलेले सुभाष नागरे आपल्याला पाहायला मिळतात. सरकारराज या चित्रपटात नागरे यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले होते. याच मुलाचा मुलगा शिवाजी (अमित संध) आणि सरकार यांच्याभोवती सरकार ३ या चित्रपटाची कथा फिरते. मुलाच्या मृत्यनंतर नागरे यांची पत्नी (सुप्रिया पाठक) अंथरुणाला खिळलेली आहे. आपल्या नातवाला आपल्या घरी राहायला यायचे आहे असे ती नांगरे यांना सांगते. आपल्या पत्नीला ते नकार देऊ शकत नाही आणि शिवाजीचा त्यांच्या घरात प्रवेश होता. शिवाजीची विचारसरणी ही सरकार यांच्यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेण्याची त्यांची पद्धत निराळीच आहे. या सगळ्यामुळे शिवाजी नेहमीच सरकार यांच्यापेक्षा वेगळे निर्णय घेताना दिसतो. पण असे असूनही यातील त्याचे काही निर्णय सरकार यांना पटतात. सरकार आपल्या नातवावर खूश असले तरी त्यांचा एकदम जवळचा मानला जाणारा गोकुळ साटम (रोनित रॉय) याला शिवाजी खटकत असतो आणि यातूनच सुरू होते नांगरे कुटुंबामध्ये कलह आणि दुसरीकडे शिवाजीची प्रेयसी अन्नू (यामी गौतम) हिच्या वडिलांचा खून हा सरकार यांनीच केला असतो. त्यामुळे आपल्या वडिलांच्या खूनाचा बदला घेण्यासाठी ती शिवाजीच्या आयुष्यात आली असल्याचे गोकुळ सरकारला सांगतो. या सगळ्या गोष्टींमुळे शिवाजी आणि सरकार यांच्यामध्ये खटके उडतात. याचा फायदा उद्योगपती मायकल (जॅकी श्रॉफ) आणि सरकारचे इतर शत्रू घेतात.
सरकार३ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी सुभाष नांगरे ही व्यक्तिरेखा खूपच चांगल्याप्रकारे उभी केली आहे. बॉलिवूडचे ते महानायक असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा या चित्रपटाद्वारे सिद्ध केले आहे. अमित संधला सुलतान या चित्रपटानंतर सरकार ३ या चित्रपटात एक चांगली भूमिका साकारायला मिळाली आहे आणि त्याने या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. रोनित रॉयदेखील गोकुळ या भूमिकेत चांगलाच लक्षात राहातो. मनोज वाजपेयी चित्रपटात खूप कमी वेळासाठी असला तरी त्याच्या वाट्याला आलेली भूमिका त्याने चांगली साकारली आहे. त्याच्या भूमिकेतदेखील सध्याच्या एका राजकीय पक्षाच्या नेत्याची छबी दिसते. सुप्रिया पाठक, रोहिणी हट्टंगडी यांसारख्या प्रतिभाशाली कलाकारांच्या वाट्याला खूपच छोट्या भूमिका आल्या आहेत. त्यामुळे त्यांना त्यांची अभिनयक्षमता चित्रपटात दाखवता आली नाही. तसेच यामीलादेखील अभिनयासाठी तितकासा वाव मिळाला नाही. तिची व्यक्तिरेखा काहीशी संभ्रमित वाटते. जॅकी श्रॉफने चांगला अभिनय केला आहे. पण प्रत्येक दृश्यात त्याच्यासोबत त्याची प्रेयसी दाखवण्यामागे दिग्दर्शकाचा हेतू काय होता हेच कळत नाही.
सरकार ३ या चित्रपटातील अमिताभ यांच्या आवाजातील गणपतीची आरती ही अतिशय श्रवणीय आहे. सरकार ३ या चित्रपटाच्या कथेत अनेक त्रुटी आहेत. पण तरीही अमिताभ बच्चन यांच्या अभिनयासाठी चित्रपट पाहाण्यास काहीही हरकत नाही.
-प्राजक्ता चिटणीस

Web Title: Amitabh Bachchan's "Govt."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.