Join us

अमिताभ बच्चन यांचे निवासस्थान कोविड प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 5:20 PM

महानगरपालिकेच्या के/पश्चिम विभाग कार्यालयाकडून निर्जंतुकीकरण आणि बंगल्यातील कर्मचाऱ्यांची तपासणी

 

मुंबई : महानगरपालिकेच्या के/पश्चिम विभाग कार्यालय हद्दीत जुहू भागात निवास स्थान असलेले, प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावर काल रात्री स्वतः जाहीर केली आहे. ते राहात असलेल्या भागातील त्यांचे चारही बंगले आज महानगरपालिकेने प्रतिबंधित क्षेत्र (containment zone) म्हणून घोषित केले आहेत. बच्चन यांच्या निवासस्थानी पालिकेकडून निर्जंतुकीकरण करून बंगल्यातील सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी (स्क्रीनिंग) तसेच अन्य तपासण्या पूर्ण केली आहे.

अमिताभ बच्चन आणि त्यांचे सुपुत्र अभिषेक बच्चन नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यानंतर महानगरपालिकेच्या के/पश्चिम कार्यालयाकडून आज (दिनांक १२ जुलै २०२०) सकाळी बच्चन कुटुंबियांच्या चारही बंगल्यावर निर्जंतुकीकरण करण्यासाठी विभाग कार्यालयाचे कर्मचारी दाखल झाले. चार ही बंगल्यावर निर्जंतुकीकरण करण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमले होते. तसेच वैद्यकीय पथकही चारही बंगल्यावर नियुक्त करून बंगल्यावरील कर्मचाऱ्यांची तपासणी  (स्क्रीनिंग) करण्यात आली. तसेच सुमारे ३० कर्मचाऱ्यांची तपासणी करून चाचणी करण्यात आली आहे. बच्चन कुटुंबीयांचे जलसा, प्रतीक्षा, जनक आणि वत्सा ही चार बंगले कोविड संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून ते सीलबंद करण्यात आले आहेत.  बच्चन कुटुंबीय व संबंधित कर्मचारी यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे तपशील संकलित करणे, संपर्कात असलेल्या व्यक्तींना अलगीकरण राहण्याचे निर्देश देणे आदी सर्व कार्यवाही विहित प्रक्रियेनुसार सुरू आहे. जलसा या बंगल्यावर तेथील कर्मचाऱ्यांना अलगीकरण करण्याची व्यवस्था असून तेथे पुरेशी जागाही आहे. यासाठी पालिकेकडून आवश्यक ती मदत केली जाणार आहे.

टॅग्स :अमिताभ बच्चनअभिषेक बच्चनऐश्वर्या राय बच्चन