मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गटापुढे अनेक मतदारसंघांत तगडा उमेदवार शोधणे मोठे आव्हान असणार आहे. मात्र, मुंबईत ठाकरे गटाने उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघांत आपला उमेदवार जवळपास निश्चित केला आहे.
उत्तर पश्चिम मतदारसंघात गजानन कीर्तिकरांचे चिरंजीव शिवसेना उपनेते व युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर यांना बळ देण्याच्या तयारीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत.
उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघांमध्ये अमोल कीर्तिकारांना साथ द्या, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन शिबिरात केले, अशी माहिती सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली. जोगेश्वरी, अंधेरी, दिंडोशी, गोरेगाव विभागांतील पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी हे निर्देश दिले.
यावेळी शिवसेना नेते व माजी मंत्री सुभाष देसाई, माजी मंत्री, आमदार, विभागप्रमुख ॲड.अनिल परब, आमदार-विभागप्रमुख सुनील प्रभू, आमदार व माजी राज्य मंत्री रवींद्र वायकर, महिला विभाग संघटक साधना माने, महिला विभाग संघटक राजुल पटेल, उत्तर पश्चिम मुंबईचे शिवसेनेचे विभाग संघटक, विभाग समन्वयक उपविभागप्रमुख माजी नगरसेवक, पदाधिकारी, शाखाप्रमुख उपस्थित होते.
दिंडोशीतून माजी महापौर सुनील प्रभू व जोगेश्वरी पूर्वमधून माजी मंत्री रवींद्र वायकर तुम्ही आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला आतापासूनच लागा, असे आदेश पक्षप्रमुखांनी दिले.
महापौर शिवसैनेचाचयेत्या चार महिन्यांत पालिका निवडणुका होण्याची शक्यता असल्याने, आतापासूनच शिवसैनिकांनी कंबर कसून कामाला लागा, गाफील राहू नका. भाजप नेते म्हणत आहेत, महापौर बसविणार, पण ते कितीही म्हणाले, तरी पालिकेत आपलाच महापौर बसणारच, असे ठामपणे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. जर पुन्हा गजानन कीर्तिकर उत्तर पश्चिममधून उभे राहिले, तर तुमच्या घरात भांडणे तर नाही होणार ना, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. यावर मी कट्टर शिवसैनिक असून, आपल्यासोबतच निवडणूक लढविणार, अशी ग्वाही अमोल कीर्तिकर यांनी ठाकरे यांना यावेळी दिली.