मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाराष्ट्रात सुरू असलेल्या कारवायांवरून भाजपा आणि तपास यंत्रणांवर मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत घणाघाती आरोप केले होते. त्यावेळी संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्यावर गंभीर आरोप केले होते. तसेच अमोल काळे कोण? असा प्रश्न उपस्थित करत आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. त्यानंतर अमोल काळे हे परदेशात गेल्याचा दावा करण्यात येत होता. दरम्यान, या आरोपांना आता अमोल काळे यांनी समोर येत उत्तर दिलं आहे.
त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांबाबत अमोल काळे यांनी पत्रकाच्या माध्यमातून निवेदन प्रसिद्ध करून उत्तर दिलं आहे. मी एक खासगी व्यावसायिक तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशनचा उपाध्यक्ष आहे. गेले दोन दिवस तसेच आज सकाळपासून काही नेत्यांनी माझ्याबाबत केलेली वक्तव्ये पाहण्यात, वाचण्यात आली. ही सारी विधाने पूर्णपणे दिशाभूल करणारी आणि माझी बदनामी करणारी आहेत.
मी महाराष्ट्र सरकारचे कुठलेही कंत्राट किंवा टेंडर घेतलेले नाही. माझ्या खासगी व्यवसायाचे सारे तपशील माझ्या प्राप्तिकराच्या विवरणामध्ये नमूद आहेत. असे असतानाही, केवळ संभ्रम निर्माण करण्यासाठी माझी हेतुपुरस्पर बदनामी जे नेते करत आहेत, त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया मी सुरू करत आहे. त्यामुळे मी परदेशात जाण्याचा कुठलाही प्रश्नच येत नाही, असेही अमोल काळे यांनी स्पष्ट केले.