Join us  

शक्तीप्रदर्शन करत आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत अमोल कीर्तिकरांनी दाखल केला उमेदवारी अर्ज 

By मनोहर कुंभेजकर | Published: May 02, 2024 5:25 PM

‘जय शिवाजी, जय भवानी’ च्या घोषणा देत महाविकास आघाडीचे हजारो कार्यकर्ते, हे पदाधिकारी व नेत्यांसह अर्ज दाखल करण्यासाठी काढलेल्या मिरवणुकीत सामिल झाले होते.

मुंबईमहाविकास आघाडीचे व उध्दव सेनेचे 27, मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे उमेदवार  अमोल कीर्तिकर यांनी आज वांद्रे पूर्व येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार शक्ति प्रदर्शन करत शिवसेना नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. ढोल-ताशाच्या गजरात, ‘जय शिवाजी, जय भवानी’ च्या घोषणा देत महाविकास आघाडीचे हजारो कार्यकर्ते, हे पदाधिकारी व नेत्यांसह अर्ज दाखल करण्यासाठी काढलेल्या मिरवणुकीत सामिल झाले होते.

अमोल कीर्तिकर यांनी आज सकाळी गोरेगाव पूर्व, आरे रोड, स्नेहदीप येथून अर्ज भरायला घरातून निघतांना त्यांचे  पत्नी सुप्रिया कीर्तिकर यांनी औक्षण केले. त्यानंतर ते सर्वप्रथम शिवतीर्थावरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर जावून अभिवादन केले व चैत्यभूमिवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस वंदन केले. नंतर ‘मातोश्री’ येथे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे आशिर्वाद घेतल्यानंतर अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात हजारो महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसह पोहोचले.

यावेळी अर्ज दाखल करताना त्यांच्या समवेत शिवसेना नेते आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते व आमदार अँड.अनिल परब, शिवसेना नेते व आमदार सुनिल प्रभू, आमदार विलास पोतनीस, राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी, आमदार ऋतुजा लटके, युवानेते व सचिव वरुण सरदेसाई, काँग्रेसचे सर्व माजी आमदार सुरेश शेट्टी, माजी आमदार अशोक भाऊ जाधव, माजी आमदार बलदेव खोसा, माजी मंत्री व आमदार अस्लम शेख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अजित रावराणे, महिला विभाग संघटक राजुल पटेल, व साधना माने, समाजवादी, काँग्रेस, राष्ट्रवादी, आप पक्षाचे जिल्हाध्यक्ष, पुरुष व महिला माजी नगरसेवक, उपविभागप्रमुख, युवासेना पदाधिकाऱ्यांसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

वांद्रे पूर्व येथील परिसर महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, समाजवादी, आप, रिपब्लीकन  पक्ष, कम्युनिस्ट पक्षांच्या कार्यकर्त्यांनी गजबजून गेला होता. आघाडीच्या घटक पक्षाचे झेंडे सर्वत्र दिसत होते. महाविेकास आघाडीच्या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते गळयात गमछे, हाती झेंडे घेवून ‘जय भवानी, जय शिवाजी’, महाविकास आघाडीचा जयजयकार करीत अमोल कीर्तिकर यांच्या मिरवणुकीत सामील झाले होते. सर्वत्र उत्साहाचे, आनंदाचे वातावरण होते.

वर्सोवा येथील कोळी बांधव आणि आरे कॉलनीतील आदिवासी बांधवांनी मोठया संख्येने आपला पारंपारिक वेष परिधान करीत, ढोल-ताशा वाजवत नाचत सहभागी झाले होते. यावेळी कीर्तिकर यांनी निवडणुकीतील लढाई सत्ताधारी हुकुमशाही विरुध्दची लढाई आहे. या लढाईत लोकशाही विजयी होणार असा विश्वास प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

टॅग्स :मुंबईअमोल कीर्तिकरआदित्य ठाकरेलोकसभा निवडणूक २०२४