कीर्तिकर की वायकर? मतदारांचा कल कोणाकडे?
By मनोहर कुंभेजकर | Published: May 14, 2024 08:50 AM2024-05-14T08:50:48+5:302024-05-14T08:51:56+5:30
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय ठरला आहे.
मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय ठरला आहे. उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक जाहीर होण्याआधीच, ९ मार्चला, सध्या शिंदेसेनेत असलेले खासदार गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी जाहीर करत आघाडी घेतली. त्यानंतर शिंदेसेनेने अगदी अलीकडे उद्धवसेनेतून आयात केलेले आमदार रवींद्र वायकर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली.
गजानन कीर्तिकर २०१४ पासून सलग दोनदा येथून खासदार आहेत. मात्र, शिवसेना दुभंगल्यानंतर ते शिंदे गटात गेले. त्यांचे पुत्र मात्र उद्धवसेनेत राहिले. अमोल कीर्तिकर यांच्यावर कोरोनाकाळात झालेल्या खिचडी वाटपातील कथित गैरव्यवहारात सहभाग असल्याचा आरोप आहे. त्यामुळे उमेदवारी जाहीर होताच त्यांना ईडीचे समन्स आले. उद्धवसेनेत असलेल्या रवींद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरी येथे पंचतारांकित हॉटेलच्या इमारतीशी संबंधित गैरव्यवहारात सहभाग असल्याचा आरोप होता. वायकर यांचीही ईडी चौकशी सुरू होती. त्यांनी अलीकडेच शिंदेसेनेत प्रवेश केल्याने वायकर यांना येथून उमेदवारी जाहीर करण्यात आली. २१ उमेदवार या ठिकाणी रिंगणात असले तरी खरी लढत कीर्तिकर आणि वायकर यांच्यातच आहे. गजानन कीर्तिकर यांनी मुलाविरोधात प्रचार करत राजकीय कर्तव्य पार पाडले असले तरी मतदारांचा कल नेमका कोणाकडे असेल हे ठामपणे सांगता येणे तूर्त तरी कठीण आहे.
पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत आहे. २०१४ साली कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. प्रचारासाठी दोन महिन्यांचा कालावधी मिळाला. त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. त्यांच्या दोनदा मतदारसंघाचा प्रचार फेऱ्या झाल्या असून सकाळ -संध्याकाळ प्रचार फेऱ्या काढून मतदारांशी संपर्क साधला आहे. वडील खासदार असल्याने गेल्या १० वर्षात मतदारसंघाशी थेट संपर्क असल्याने तसा हा मतदारसंघ त्यांच्यासाठी काही नवीन नाही.
प्रथमच लोकसभेची निवडणूक लढवत आहे. प्रचारात जरी वेळ कमी मिळाला असला तरी त्यांनी सकाळ संध्याकाळ प्रचार फेऱ्या, बैठका घेत त्यांचा प्रचार जोमानं सुरू आहे. आणि भाजपाचे तीन आमदार, माजी खासदार संजय निरुपम, मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे आदी प्रचारात उतरले आहेत. ३५ वर्षे राजकारणात असून चार वेळा महापालिकेत नगरसेवक आणि तीन वेळा जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्राचा आमदार असून निवडणुकींचा प्रदीर्घ अनुभव आहे.
अमोल कीर्तिकर आणि रवींद्र वायकर यांच्यात काँटे की टक्कर होणे अपेक्षित आहे. शिंदेगटाने वायकर यांच्या प्रचारासाठी ताकद लावल्याचे चित्र आहे. तर कीर्तिकर यांनीही प्रचारात आघाडी घेतली आहे.
गेल्या पाच निवडणुकांमध्ये काेणत्या पक्षाचा खासदार
१९९९ सुनील दत्त, कॉँग्रेस
२००५ प्रिया दत्त, कॉँग्रेस
२००९ गुरुदास कामत, काँग्रेस
२०१४ गजानन कीर्तिकर, शिवसेना
२०१९ गजानन कीर्तिकर, शिवसेना
मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील आमदार कोण?
अमित साटम - अंधेरी पश्चिम
डॉ. भारती लव्हेकर - वर्सोवा
विद्या ठाकूर - गोरेगाव
रवींद्र वायकर - जोगेश्वरी पूर्व
सुनील प्रभू - दिंडोशी
ऋतुजा लटके - अंधेरी पश्चिम