Amol Kirtikar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा झाली. यात मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्याविरोधात त्यांचे वडिल गजानन किर्तीकर यांनी प्रचार केला. तर आता मतदान संपल्यानंतर गजानन किर्तीकर यांनी प्रचार करता आला नसल्याने खंत व्यक्त केली आहे. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनी किर्तीकर यांची हाकलपट्टी करावी अशी मागणी केली आहे. यावर आता अमोल किर्तीकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
"गजानन किर्तीकर कालच खासदार झालेले नाहीत, ते गेल्या दहा वर्षापासून खासदार आहेत. त्यातील नऊ वर्ष ते शिवसेना या प्रमुख पक्षाबरोबर आहेत. ते गेल्या वर्षभरापासून शिंदे यांच्याबरोबर आहेत. त्यामुळे नऊ वर्षाचे क्रिडीट हे शंभर टक्के मला मिळणार, माझ्या कार्यकर्त्यांना मिळणार, माझ्या पक्षाला मिळणार. त्यांनी जर पक्ष बदल केल्यानंतर लोकांपर्यंत ते पोहोचले नसतील तर तो त्यांचा प्रश्न आहे", असंही अमोल किर्तीकर म्हणाले.
"आमचं ऑफिस वैयक्तिक आहे, पहिल्यापासून इथे दोन केबिन आहेत. एका ठिकाणी गजानन किर्तीकर बसतात एका ठिकाणी अमोल किर्तीकर बसतात. निवडणूक काळात आमचा वेळ गोरेगावमधील ऑफिसमध्ये गेला. ज्या लोकांना हे ऑफिस सोयिस्कर आहे त्यांना मी या ऑफिसला भेटायचो. गजानन किर्तीकर यांच्या नावाचा मला फायदा झाला. मला त्यांच्यामुळे अनेकांनी मदत केली, असंही अमोल किर्तीकर म्हणाले.
शिशिर शिंदे यांची गजानन कीर्तिकरांवर टीका
शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनी गजानन कीर्तिकर यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. गजानन कीर्तिकर यांची पक्षविरोधी वक्तव्यं केल्याप्रकरणी त्वरीत शिवसेनेतून हकालपट्टी करून त्यांना निरोपाचा नारळ द्यावा अशी मागणी शिशिर शिंदे यांनी केली आहे. यावर आता प्रत्युत्तर देताना कीर्तिकर यांनी पक्षाच्या बैठकीत मी पक्षाविरोधात जाणार नाही असं सांगितलं होतं. पण आता कोणीतरी चुगली, संशय व्यक्त करणार असेल तर ते मला चालणार नाही, असं म्हटलं आहे.
"मातोश्रीचे लाचार श्री होणाऱ्यांना पक्षातून त्वरीत बाहेरचा रस्ता दाखवावा अशी मागणी शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. गजानन किर्तीकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर यांना ठाकरे गटाने उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यांनतर अमोल कीर्तिकर हे गजानन कीर्तिकर यांच्याच कार्यालयातून कारभार करत होते. गजानन कीर्तिकर शिवसेनेत असतानाही त्यांचा खासदार निधी अमोल किर्तीकर यांनी स्वत:च्या प्रचारासाठी, विकास कामांसाठी वापरला. त्यामुळे त्याचा शिवसेना पक्षाला शून्य लाभ झाला. मात्र फायदा ठाकरे गटाला झाला. परवा मतदानाच्या दिवशी गजानन कीर्तिकर यांच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत ठाकरे गटाची बाजू घेतली होती. गजानन कीर्तिकर यांना मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई झालेली आहे. गजानन किर्तीकर यांचे हे उद्योग पक्षाला बदनाम करत आहेत. त्यामुळे आता गजानन किर्तीकर यांची पक्षातून त्वरीत हकालपट्टी करावी आणि त्यांना निरोपाचा नारळ द्यावा," असे शशिकांत शिदे यांनी पत्रात म्हटलं आहे.