मुंबई : महाविकास आघाडीचे उद्धव सेनेचे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे उमेदवार अमोल कीर्तिकर हे आपला नामांकन अर्ज दि,२ मे रोजी सकाळी ११ वाजता, महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वांद्रे पूर्व येथे उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करणार आहे.
सर्वप्रथम सकाळी ८.३० वाजता कीर्तिकर हे शिवतीर्थावरील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जावून पुष्पवृष्टी करुन त्यांना विनम्र अभिवादन करतील. त्यानंतर चैत्यभूमीवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन करणार आहेत. ‘मातोश्री’ येथे शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे व रश्मी ठाकरे यांचा आशिर्वाद घेणार आहेत. युवासेना प्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या सह तेथून जिल्हाधिकारी कार्यालयात महा विकास आघाडीच्या हजारे कार्यकर्त्यांसह वाजत – गाजत, ढोल-ताशाच्या गजरात निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी आगेकूच करतील.
अमोल कीर्तिकर यांचा नामांकन अर्ज दाखल करताना त्यांच्या समवेत शिवसेना ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते व आमदार ॲड. अनिल परब, शिवसेना नेते व आमदार सुनिल प्रभू, प्रवक्ता व राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी, आमदार विलास पोतनिस, आमदार ऋतुजा लटके, महिला विभाग संघटक राजूल पटेल व साधना माने उपस्थित असतील. तर काँग्रेसतर्फे माजी मंत्री अस्लम शेख, माजी आमदार सुरेश शेट्टी, माजी आमदार अशोक भाऊ जाधव, माजी आमदार बलदेव खोसा, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष क्लाईव्ह डायस, राष्ट्रवादी, समाजवादी, आप पक्षाचे जिल्हाध्यक्ष, माजी नगरसेवक, पुरुष व महिला पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी आदींसह शेकडो पदाधिकारी व महाविकास आघाडीचे हजारो कार्यकर्ते हजर राहणार आहेत.
याशिवाय वर्सोवाचे कोळी बांधव आणि गोरेगाव आरे विभागातील आदिवासी बांधव हे आप-आपल्या पारंपारिक पध्दतीचा वेष परिधान करुन या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.