Join us  

Amol Kolhe: घे टाळी... तो हसमुख फोटो टिपणाऱ्या फोटोग्राफरचं खासदार कोल्हेंकडून कौतूक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2022 9:32 AM

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांचा एक फोटो सोशल मीडियावर नेहमीच दिसून येतो

मुंबई - राजकारण, कला, क्रीडा किंवा सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना मोठं करण्यात, त्यांचा चेहरा सर्वदूर पोहोचविण्यात फोटोग्राफर्संचं कमालीचं योगदान असतं. अनेकदा फोटोग्राफरने काढलेला एकदा फोटो हा अविस्मरणीय बनतो. म्हणूनच, कधी कधी वाईल्ड लाईफ फोटोग्राफीतील काही फोटो हे चांगलेच व्हायरल झाल्याचे आपण पाहिले आहेत. फोटोग्राफर्सशी राजकीय नेते, खेळाडू, कलाकार यांचं वेगळंच नातं असतं. त्यामुळेच, आपल्या निवृत्तीच्या भाषणात सचिन तेंडुलकरने मला जगभर पोहचविणाऱ्या फोटोग्राफर्संचे आभार... असे म्हणत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली होती. आता, खासदार अमोल कोल्हे यांनीही एका फोटोग्राफर्सबद्द अशीच कृतज्ञता व्यक्त केली आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांचा एक फोटो सोशल मीडियावर नेहमीच दिसून येतो. अनेकदा अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यातील जवळीकता दर्शवतानाही हा फोटो शेअर केला जातो. त्यामध्ये, अजित पवार आणि कपाळी अष्टगंध लावलेल्या अमोल कोल्हेंच्या चेहऱ्यावर स्मीतहास्य आहे. कदाचित एखाद्या वाक्यावर एकमत झाल्याने अजित पवारांनी घे टाळी... म्हणताच अमोल कोल्हेंनी हात पुढे करत स्मीतहास्य केल्याचं या फोटोतून दिसून येतं. अमोल कोल्हे आणि अजित पवार यांचा हा फोटो एका सर्वसामान्य कुटुंबातून, स्व-कष्टातून पुढे आलेल्या शिवराज माने या फोटोग्राफरने काढला होता. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान जिंतूर येथील मेळाव्यात अजित पवार आणि अमोल कोल्हे एकाच मंचावर होते. त्यावेळी, या दोघांमधील संवाद सुरु असताना हा फोटो काढण्यात आला होता. शिवराज माने या फोटोग्राफरने पुण्यात भेट घेऊन खासदार अमोल कोल्हेंना या फोटोची फ्रेम भेट दिली. त्यावर, ही खूपच अविस्मरणीय भेट असल्याचं खासदार कोल्हेंनी म्हटलं आहे. तसेच, या फोटोग्राफर्सच्या कौशल्याचंही भरभरुन कौतूक केलंय.   बीड शहरातील सामान्य कुटुंबात जन्मलेल्या शिवराजने आपल्या लहानपणापासूनच आईवडिलांचा जगण्यासाठीचा संघर्ष बघितला आणि नुसता बघितलाच नाही तर त्यावर गांभीर्याने विचार करत आपली वाटचाल सुरु केली. या परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी त्याने फोटोग्राफीची निवड केली आणि त्यात स्वतःला झोकून दिले. आपले कौशल्य, कामातील प्रामाणिकपणा व गुणवत्ता या जोरावर त्याने खूप कमी वयात राज्यभर निर्माण केलेला नावलौकिक कौतुकास्पद आहे. आज त्यांचं राजकीय फोटोग्राफीमध्ये खूप मोठं नाव आहे. 

शिवराजने शिवस्वराज्य यात्रेदरम्यान उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्यासमवेत गप्पा मारताना एका प्रसन्न क्षणी माझा फोटो टिपला आणि सुंदर फ्रेम करून मला भेट दिला. ही खूपच अविस्मरणीय भेट आहे. शिवराज, या सुंदर भेटीबद्दल खूप खूप आभार!, अशी फेसबुक पोस्ट अमोल कोल्हेंनी शेअर केली आहे.  

टॅग्स :डॉ अमोल कोल्हेअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसबीड