मुंबई - आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेतील परिस्थिती आता दिवसेंदिवस अधिक बिकट होत चालली आहे. ताज्या माहितीनुसार आर्थिक परिस्थितीनं त्रासलेल्या जमावानं शनिवारी राष्ट्रपती गोयबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानाला घेराव घातला. त्यानंतर गोटबाया राजपक्षे यांनी निवासस्थान सोडून पळ काढला आहे. त्यांनी आंदोलक अधिक हिंसक होत असल्यामुळे पळ काढल्याची माहिती आहे. या घेरावाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यावरुनच, खासदार अमोल कोल्हे यांनी एक राजकीय विधान केलं आहे.
संरक्षण विभागातील सुत्रांच्या माहितीनुसार राजपक्षे आता राष्ट्रपती भवनात नाहीत. कोलंबो स्थित राष्ट्रपती भवनाला आंदोलकांनी घेरलं आहे. यानंतर आंदोलकांनी गोटबाया यांच्या निवासस्थानातील सामानाचीही तोडफोड केली. श्रीलंकेतील वाढत्या आर्थिक संकटामळे जनतेतून राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. सरकार विरोधात देशभरात हिंसक निदर्शनं होतं आहे. सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात रॅली काढल्या जात आहेत. राजपक्षे यांच्या निवासस्थानाच्या चारही बाजूंनी नागरिक रस्त्यावर उतरल्याचे व्हायरल व्हिडिओत दिसत आहे.
श्रीलंकेत संचारबंदी
शुक्रवारी श्रीलंकेत अनिश्चित कालावधीसाठी कर्फ्यू घोषीत करण्यात आला आहे. तसंच सैन्याला देखील हायअलर्ट मोडवर ठेवण्यात आलं आहे. पोलीस प्रमुख चंदना विक्रमरत्ने यांनी दिलेल्या माहितीनुसार राजधानी आणि आसपासच्या शहरांमध्ये शुक्रवारी नऊ वाजल्यापासून कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. हजारो आंदोलकांनी सरकार विरोधी निदर्शनं करत राष्ट्रपती भवनातील सत्ता उलथवून टाकण्यासाठी भवनात प्रवेश केला होता. त्यामुळे कर्फ्यूची घोषणा करण्यात आल्याचं पोलीस अधिकारी म्हणाले.