Join us

Amol Kolhe : नथुराम गोडसेच्या भूमिकेत खासदार अमोल कोल्हे, व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 7:15 PM

खासदार कोल्हे यांच्या  “Why I killed  Gandhi” या चित्रपटाचा ट्रेल सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेक सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर झाला आहे

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि खासदार असलेले डॉ. अमोल कोल्हे हे एक कलाकार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत ते यापूर्वी झळकले आहेत. त्यातून महाराष्ट्राने या कलाकाराला डोक्यावर घेतलं. या कलाकृतीतून महाराष्ट्रभर ओळख झालेल्या कोल्हेंना राजकारणतही संधी मिळाली, सुरुवातीला शिवसेना पक्षातून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. त्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून ते पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आले. मात्र, पक्षाच्या विचारधारेशी विसंगती असलेल्या नथुराम गोडसेच्या भूमिकेत आता ते झळकले आहेत. 

खासदार कोल्हे यांच्या  “Why I killed  Gandhi” या चित्रपटाचा ट्रेल सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेक सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर झाला आहे. त्यामध्ये, ते नथुराम गोडसेंच्या भूमिकेत खासदार कोलेहे दिसून येत आहेत. यासोबतच, त्यांच्या नावाने एक फेसबुक पोस्टही व्हायरल होत आहे. 'मी आणि नथुराम गोडसे' या मथळ्याखाली भलीमोठी पोस्ट लिहून एक कलाकार म्हणून आपण ही भूमिका स्विकारल्याचं त्या पोस्टमधून सांगण्यात आलंय. मात्र, सध्या हा ट्रेलर आणि त्यावर सोशल मीडियातून चांगलीच चर्चा रंगली आहे. या चर्चेतून अनेकांनी त्यांना ट्रोल केलंय , तर काहीजण त्यांचे समर्थनही करत आहेत. 

खासदार कोल्हेंच्या नावाने खालील पोस्ट फिरतेय 

मी आणि नथुराम गोडसे ही भूमिका: -२०१७ साली केलेला “Why I killed  Gandhi” हा सिनेमा Limelight या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असं समजलं आणि अनेकांनी विचारलं डॉक्टर तुम्ही नथुराम गोडसे या भूमिकेत? उत्तरादाखल मला कुठेतरी वाचलेलं वाक्य आठवलं- “हा महाराष्ट्र कीर्तनानं पूर्णपणे घडला नाही आणि तमाशानं पूर्णपणे बिघडला नाही!”  या वाक्यातील नकारात्मक सूर बाजूला ठेवला तर मला या वाक्यात एक सकारात्मक गोष्ट जाणवते ती म्हणजे “Reel लाईफ” आणि “Real लाईफ” यातील फरक स्पष्ट करणारी सीमारेषा अधोरेखित करणं.कलाकार म्हणून भूमिका साकारत असताना काही भूमिका आव्हानात्मक असतातच आणि त्यांच्या विचारधारेशी सुद्धा आपण सहमत असतो आणि त्या साकारताना समाधानही मिळतं परंतु काही अशा भूमिका अचानक समोर येतात ज्या विचारधारेशी आपण सहमत नसतो पण कलाकार म्हणून त्या आव्हानात्मक असतात. अशीच ही भूमिका नथुराम गोडसे. मी व्यक्तिगत पातळीवर गांधीजींची हत्या तसेच नथुराम उदात्तीकरण या दोन्हीसाठी समर्थक नाही तरी समोर आलेल्या भूमिकेस न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. कलाकार म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर आणि व्यक्ती म्हणून विचारस्वातंत्र्याचा!याच मनमोकळेपणाने आपण या कलाकृतीकडे पहावं ही अपेक्षा! 

टॅग्स :डॉ अमोल कोल्हेनथुराम गोडसेमहात्मा गांधीसोशल मीडिया