Amol Mitkari: सदाभाऊंच्या तमाशाला अमोल मिटकरींचं प्रत्युत्तर, काकांचा व्हिडिओच दाखवला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 09:28 AM2022-04-27T09:28:27+5:302022-04-27T09:47:35+5:30
भाजपच्या फडात तुणतूनं हातात घेऊन वाजवणाऱ्याची भूमिका सध्या सदाभाऊंची आहे.
मुंबई - आमदार अमोल मिटकरी यांच्यावर टीका करताना नेते सदाभाऊ खोत यांची जीभ चांगलीच घसरली. अमोल मिटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशाच्या फडावरचा नाच्या आहे, असे आक्षेपार्ह वक्तव्य माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जातीयवादाला खतपाणी घातल्याचा आरोप त्यांनी केला. सदाभाऊ खोत यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनीही त्याच भाषेत खोत यांच्यावर जबरी टिका केली आहे. मिटकरी यांनी एका काकांनी खोत यांच्याबद्दल दिलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडिओही शेअर केला आहे.
सदाभाऊ खोत यांनी सांगलीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अमोल मिटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशामधील फडावरचा नाच्या आहे. त्यांचे फार मनावर घेण्याचा प्रश्न नाही. तोडा फोडा अशी राष्ट्रवादीची नीती आहे. अनेक नेते प्रत्येक समाजाचे घ्यायचे जातीयवाद करायचा आणि पवार साहेब आपले तारणहार आहेत. हे समाजाला समजावण्याचं काम राष्ट्रवादीमधील नेते करतात, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली होती. सदाभाऊ यांनी केलेल्या टिकेला आता अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलंय.
भाजपच्या फडात तुणतूनं हातात घेऊन वाजवणाऱ्याची भूमिका सध्या सदाभाऊंची आहे. डोंबिवली पलावा येथे आयोजित एका कार्यक्रमात अमोल मिटकरी आले होते. याबाबत बोलताना, मी शेतकरी कुटुंबातला साधा माणूस आहे, सदाभाऊ स्वतःला शेतकऱ्यांचा नेता म्हणून घेतात मी त्यांच्यावर टीका करण्याइतका मोठा नाही. मात्र, सदाभाऊची परिस्थिती भाजपच्या फडात तुणतूनं हाती घेतलेल्या माणसासारखी झाले आहे का? ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला.
लायकीच दाखवली काकांनी तर 🤣🤣 pic.twitter.com/Wzjojd5rrJ
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) April 26, 2022
शेवटी जसा पिंजरा चित्रपटात ज्या गुरुजींनी तमाशाला विरोध केला आणि शेवटी त्यांनाच नाचावे लागलं तशी परिस्थिती सदाभाऊची झाली आहे. भाजपच्या आगामी काळात सदाभाऊंची भूमिका त्या फडात तुणतूनं हातात वाजवणाऱ्याची राहील अशी टीका मिटकरींनी केली. दरम्यान, मिटकरी यांनी ट्विटर अकाऊंटरुन एक व्हिडिओही शेअर केला आहे. त्यामध्ये, साकलवर बसून पुढे जाण्यापूर्वी एका काकांनी सदाभाऊ खोत यांच्यावर मिटकरींनी केलेल्या शब्दातील टिका केल्याचं पाहायला मिळत आहे.
सदाभाऊंची मुख्यमंत्र्यांची टिका
राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही. मातोश्री बाहेर डायलॉग बाजी करतील. एक आजी बाई आली आणि डायलॉग बाजी केली आणि मुख्यमंत्री त्यांना भेटायला गेले. या महाराष्ट्रात अनेक आज्जी बाई आहेत. त्याचे डोळे पुसण्यासाठी वेळ मिळाला का? असा सवाल करत सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. आघाडी सरकार म्हणजे खाकी आणि खादीची युती आहे. सरकारमध्ये गुंडगिरी उफाळून आली आहे. या सर्व विषयावर जनतेमध्ये जाऊ आणि संघर्ष उभा करू, असेही सदाभाऊ खोत म्हणाले.