मुंबई - राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दिवसाची सुरुवात सत्ताधारी आणि विरोधकांच्या जोरदार राड्यानं झाली आहे. ज्या विधानभवनात राज्याच्या जनतेसाठी कायदे आणि निर्णय घेतले जातात त्याच विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा झाला. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कालच महाराष्ट्राने आजपर्यंत सभ्यता आणि संस्कार पाळल्याचं सांगितलं होतं. आपल्या ज्येष्ठांनी यापूर्वीही विधानसभेत सभ्यतेचं राजकारण केलं असून आपणही ती परंपरा जपत आहोत, असं ते म्हणाले. मात्र, आज सभागृहाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलाच राडा झाल्याचा पाहायला मिळालं.
महाराष्ट्र विधानसभेच्या पायऱ्यावरील व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक जोरजोराने ओरडत असल्याचे दिसून येते. एका व्हिडिओत आमदारअमोल मिटकरीआमदाररोहित पवार हे जोरजोरात ५० खोके एकदम ओक्के म्हणत बॅनरबाजी करताना दिसत आहेत. याचदरम्यान, रोहित पवारअमोल मिटकरींच्या कानात काहीतरी सांगतात. त्यानंतर, मिटकरी, रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवीचे आमदार शिंदे गटाच्या आमदारांसमोर जोरजोरात ५० खोके, एकदम ओक्के असल्याच्या घोषणा देताना दिसत आहेत.
विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी आणि आंदोलनं याआधीही केली जात होती. यात काही नवी बाब नाही. पण आज चक्क सत्ताधाऱ्यांनी विरोधकांकडून गेल्या दोन दिवसांपासून केल्या जात असलेल्या आंदोलनाचा निषेध व्यक्त करण्यसाठी निषेधाचा कार्यक्रम आयोजित केला गेला. सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांनी गेल्या अडीच वर्षात केलेल्या सत्तेतील कामगिरीवरुन सध्याचे सत्ताधारी आक्रमक झाल्याचं दिसून आलं. मात्र, या दोन्ही गदारोळात महाराष्ट्र विधानसभेच्या कामकाजाला गालबोट लागण्याचं काम आज झालं आहे. दरम्यान, या गदारोळात दोन्ही गटाच्या आमदारांनी एकमेकांना धक्काबुक्कीही केल्याचं दिसून आलं.
आमदार भरत गोगावले म्हणाले, अंगावर आलात तर शिंगावर घेऊ
"महाविकास आघाडीच्या आमदारांनी गेल्या काही दिवसांपासून विधीमंडळाच्या पाऱ्यांवर रोज आंदोलन केले. आम्ही आज केले. आम्ही १७० आहोत, ते ९९-१००. आम्ही सगळेच आलो असतो तर काय झाले असते. ते आमच्यावर आंदोलन करून आरोप करत होते. तेव्हा आम्ही बाजुने जात होतो. त्यांना उत्तरही देत नव्हतो. आज आम्ही पहिले तिथे होतो. त्यांचा इतिहास काढत होतो. ते त्यांना झोंबले. आमच्या आडवे आले तर आम्ही त्यांना आडवे जाऊ. आमच्या अंगावर कुणी आले तर शिंगावर घेऊ", असं शिंदे गटातील आमदार भरत गोगावले म्हणाले.