Join us  

Amol Mitkari: शेतकरी 'हिंदू' नाहीयं का? सरकारच्या शेतकरी धोरणावरुन मिटकरींचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 11:24 AM

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली

मुंबई -राज्यातील अतिवृष्टीग्रस्त जिरायती (कोरडवाहू) शेतकऱ्यांना दुप्पट आणि तीन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. राज्याच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी, महापुराचा फटका बसलेला असताना सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. मात्र, हे सरकार शेतकरी विरोधी असून शेतकरी आत्महत्येच्या संख्येत वाढच होत असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून सभागृहाबाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिंदे सरकावर जबरी टिका केली. 

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर, भाजप-युतीचं सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं. या सरकारमध्ये शेतकऱ्यांना, सर्वसामान्यांना आणि कष्टकऱ्यांना प्राधान्य आहे. हे सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांचं सरकार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमीच सांगतात. तसेच, शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र हेच आमचं ध्येय असल्याचंही या सरकारने जाहीर केलं आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांसाठी आम्ही हिताचे निर्णय घेत असल्याचंही त्यांचे प्रवक्ते दिपक केसरकर नेहमीच सांगतात. मात्र, राज्यात शेतकरी आत्महत्येच्या संख्येत वाढ झाल्याचं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. 

आम्ही हिंदुत्त्ववादी भूमिका घेऊन एकत्र आलो, हे बाळासाहेबांच्या हिंदुत्त्वावादी विचारांचं सरकार असल्याचं मुख्यमंत्री सांगतात. मग, या राज्यातील शेतकरी हिंदू नाहीये का? असा सवाल अमोल मिटकरी यांनी सरकारला विचारला आहे. तसेच, हे सरकार शेतकरीविरोधी असून शेतकऱ्यांना अद्यापही काही ठोस मदत मिळाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अवैध सावकारकीला शेतकरी संतापले आहेत. विदर्भात अतिवृष्टीमुळे, कापूस उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. हे सरकारने घोषणा केल्या, वल्गना केल्या पण त्यात ते सरकार फोल ठरलंय, असंही मिटकरी यांनी म्हटलं. 

दरम्यान, गत मंगळवारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक मंत्रालयात झाली. तीत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाईच्या मदतीपोटी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या (एनडीआरएफ) निकषाच्या दुप्पट मदत देण्याचा निर्णय झाला. या निर्णयाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना दिली होती.

टॅग्स :अमोल मिटकरीएकनाथ शिंदेशेतकरीहिंदू