Join us

Amol Mitkari: तुम्ही वाईट वाटून घेऊ नका; मिटकरींवर चिडलेल्या ब्राह्मण समाजाला सुप्रिया सुळे म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 1:57 PM

खासदार सुप्रिया सुळे पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातून बाहेर पडतानाच ब्राह्मण समाजबांधवाची त्यांची भेट घेतली.

मुंबई -  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगली येथे केलेल्या सभेत हिंदू धर्माची प्रथा कन्यादान यावरुन वादग्रस्त विधान केले. त्यावरुन राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. अमोल मिटकरींनी माफी मागावी अशी मागणी ब्राह्मण महासंघाकडून केली जात आहे. पुण्यात ब्राह्मण महासंघानेराष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालयसमोर आंदोलन केले. तर, पंढरपुरातही ब्राह्मण समाजबांधवांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख महिला नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन मिटकरींवर कारवाई करण्याची मागणी केली. 

खासदार सुप्रिया सुळे पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातून बाहेर पडतानाच ब्राह्मण समाजबांधवाची त्यांची भेट घेतली. यावेळी, आमदार अमोल मिटकरी हे सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करुन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. सांगली येथील त्यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. पक्षाने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी ब्राह्मण समाज बांधवांनी केली. 

आमचं काही चुकीचं असेल तर सांगा, पण काही लोकं वारंवार जाणीपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, आपण कारवाई करावी, अशी मागणी ब्राह्मण महासंघाने केली. त्यावेळी, मी व्हिडिओ पाहिला नाही, ऐकला नाही, वाचलेलंही नाही, मी माहिती काढते. त्यानंतर, मी जयंत पाटील यांच्याशी बोलते, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. मॅडम, आपण एखादं ट्विट करा, तुमच्या ट्विटला सगळे फॉलो करतात, असेही एकत्रित आलेल्या समाजबांधवांनी म्हटले. त्यावेळी, जर तुम्ही दुखावले गेले असाल तर मी माहिती काढते आणि त्याला जोर धरुन सांगते की तुम्ही दुखावले गेले आहात, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, असे म्हणत सुळे यांनी आंदोलकांची समजूत काढली. 

जयंत पाटलांची दिलगिरी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. अमोल मिटकरींचं विधान योग्य नव्हतं. अमोल मिटकरी यांचं हे वैयक्तिक विधान होतं. कोणत्याही समाजाला दुखवण्याचा हेतू नव्हता. तसेच अमोल मिटकरी यांना सदर विधान करताना मी माइकवर टॅप करुन भाषण थांबविण्याची खूण केली होती, असा दावा देखील जयंत पाटील यांनी केला आहे. माझ्या उपस्थितीत सदर प्रकार घडल्याने मी याबाबत दिलगिरी व्यक्त करतो, असंही जयंत पाटील म्हणाले.

पुण्यात राष्ट्रवादीविरुद्ध ब्राह्मण महासंघ

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयाबाहेर आंदोलन केले. ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे व त्यांचे सहकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही आक्रमक झाल्याचे चित्र दिसून आले. दोघांमध्ये झटापट झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अमोल मिटकरी हे मूर्ख असून ते ब्राह्मण समाजाविरोधात बोलले आहेत असे आम्ही म्हणतच नाही. पण त्यांनी हिंदु धर्मातील एक मंत्र चुकीच्या पद्धतीने वापरला यावर आम्ही आक्षेप घेतला आहे. मी माझी बायको पुरोहिताला देत आहे असं त्यांनी म्हटलं होत. हे चुकीचं आहे. नमाजविरोधात मिटकरी असं बोलतील का? असा सवाल ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी यावेळी उपस्थित केला. त्यांनी हिंदु धर्माचं त्यांनी विडंबन केल्यामुळं आम्ही त्याचा निषेध आंदोलन केले आहे. असा कुठलाही मंत्र लग्नांमध्ये बोललाच जात नसल्याचेही ते यावेळी म्हणाले

टॅग्स :सुप्रिया सुळेराष्ट्रवादी काँग्रेसब्राह्मण महासंघअमोल मिटकरी