मुंबई/रायगड - रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन हरिहरेश्वरच्या समुद्रात दोन संशयास्पद बोटी सापडल्याने खळबळ उडाली होती. या बोटींमध्ये एके-४७ सह काही शस्रास्त्रे सापडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, ही बोट समुद्रात भरकटून रायगडच्या किनाऱ्यावर आल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बोटीबाबत सभागृहात महत्त्वपूर्ण माहिती दिली. तरीही विरोधकांनी या बोटीवरुन घातपाताचा संशय व्यक्त केल आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी सरकारला थेट इशाराच दिला आहे.
रायगडच्या श्रीवर्धन येथे सापडलेल्या बोटीवरुन आमदार अमोल मिटकरी यांनी माध्यमांशी बोलताना सरकारला एकप्रकारे इशाराच दिला आहे. महाराष्ट्राच्या आणि हिंदूच्या संरक्षणासाठी सत्तेवर आल्याच्या आणाभाका करणाऱ्या या सरकराच्या यंत्रणांचं हे फेल्युअर आहे. देशात सणांची रेलचेल सुरू असून उद्या दहीहंडी उत्सव साजरा होत आहे. मात्र, तरीही अशा घटना घडत आहेत, हे सरकारच्या इंटेलिजन्सचं फेल्युअर आहे. आज हिंदूंच्या 33 कोटी देवांपैकी महत्त्वाच्या असलेल्या श्रीकृष्णांची जन्माष्टमी आहे. पुढं गणेशोत्सव आहे. या धरतीवर शत्रुंकडून आमच्या महाराष्ट्रावर हल्ला करण्याच्या हालचाली सुरू आहेत. दुसरीकडे सरकार आमची यंत्रणा अलर्ट असल्याचं म्हणत आहे. यापूर्वी केंद्र सरकारही असंच म्हणत होतं, पुलवामा हल्ल्यापूर्वी, पण त्यानंतर पुलवाला हल्ला झाला आणि अनेक जवान शहीद झाले, असे म्हणत आमदार अमोल मिटकरींनी राज्य सरकारला धारेवर धरलं.
तर सरकारला सोडणार नाही
श्रीवर्धनला बोटीत रायफली सापडल्या, शस्त्रास्त्र सापडली हा हिंदूंच्या सणांवर हल्ला करण्याचा शत्रुंचा प्रयत्न असेल. त्यामध्ये, महाराष्ट्र सरकार सपशेल अपयशी ठरलं आहे. शत्रुंचं हे नियोजनपूर्वक असावं, पण याला सरकार छुप्या पद्धतीनं सहकार्य करत असेल तर सरकारचं साठंलोठं आहे का? असा सवालही अमोल मिटकरी यांनी विचारला आहे. तसेच, सरकारचं इंटेलिजन्स फेल्युअर आहे, असेही ते म्हणाले. विरोधी पक्षांनी यासंदर्भात सभागृहात आवाज उठवला आहे. पण, यात कोणाचा घातपात झाल्यास आम्ही सरकारला सोडणार नाही, असा इशाराच मिटकरी यांनी दिला आहे.
बोटीबाबत फडणवीसांनी दिली माहिती
रायगडमध्ये सापडलेल्या संशयास्पद बोटीबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, समुद्रात संशयास्पद बोट आढळल्यानंतर हायअलर्टचे आदेश देण्यात आले आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या बोटीचे नाव ईडीहार्ट असून, सदर बोट ही ऑस्ट्रेलियन महिलेच्या मालकीची आहे. या महिलेचे पती स्वत: या बोटीचे कप्तान असून, ती बोट मस्कतहून युरोपकडे जाणार होती. २६ जून रोजी सकाळी या बोटीचे इंजिन निकामी झाले आणि खलाशांनी मदतीसाठी कॉल दिला. दुपारी एका कोरियन युद्धनौकेने या खलाशांची सुटका करून त्यांना ओमानकडे सुपुर्द केले. समुद्र खवळलेला असल्याने इडिहार्ड या नौकेचे टोईंग करता आले नाही. समुद्राच्या अंतर्गत प्रवाहांमुळे ही नौका भरकटत हरिहरेश्वरच्या किनाऱ्याला लागली, अशी माहिती भारतीय कोस्टगार्डकडून देण्यात आली आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.