मुंबई - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि त्यांची विधानं ही अनेकदा चर्चेचा आणि वादाचा मुद्दा बनली आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी पुण्यात सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल केलेल्या विधानानंतर आता पुन्हा एकदा मराठी माणसाला दुखावेल असं विधान केल्याने विरोधी पक्षातील अनेक नेतेमंडळी आक्रमक झाली आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहतील, असे शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनीही राज्यपालांवर जबरी शब्दात टिका केली आहे.
राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबईच्या आर्थिक सुबत्तेवर भाष्य करताना गुजराती आणि राजस्थानी लोकांचं कौतुक केलं. मात्र, हे कौतुक करताना अप्रत्यक्षपणे त्यांनी मराठी माणसांचा अपमान केल्याची टिका आता राज्यपाल महोदयांवर होऊ लागली आहे. त्यावरुन, सोशल मीडियावर राज्यपाल कोश्यारी पुन्हा ट्रोल होत आहेत. आमदार मिटकरी यांनीही ट्विट करुन राज्यपालांचे हे हास्त सनातनी असल्याचं त्यांनी म्हटलंय.
''राज्यपाल भगतसिंह कोशियारी महात्मा फुले- सावित्रीबाईंबद्दल बोलताना, आणि आत्ता मुंबई बद्दल बोलताना ज्या पद्धतीने हसत होते.. हे हास्य नीट ओळखा. ते, हजारो वर्षांचं सनातनी हास्य आहे,'' असे ट्विट मिटकरी यांनी केलं आहे.
काय म्हणाले राज्यपाल?
ठाणे, मुंबई या शहरातून गुजराती, राजस्थानींना काढून टाकले तर तुमच्याकडे पैसेच उरणार नाही. मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं तेदेखील म्हणता येणार नाही असं वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात केले आहे. त्यामुळे राज्यपालांच्या या विधानावरून नवा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने राज्यपालांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांनी माफी मागावी असं म्हटलं आहे.
सर्व आमदार मुख्यमंत्र्यांना भेटतील
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्याच्या भावना जपल्या पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दौऱ्यावरून परतल्यानंतर सगळे आमदार त्यांना भेटतील. मराठी माणसांच्या भावना तीव्र आहेत. मुख्यमंत्री केंद्राला याबाबत पत्र लिहून कळवतील. मुख्यमंत्री मराठी माणसांच्या भावना केंद्राला कळवतील. राज्यकर्त्यांनी जी भूमिका घ्यायची असते ती आम्ही घेऊ असंही दीपक केसरकर यांनी म्हटलं. दरम्यान, राज्यपाल पदावर असतात तेव्हा वादग्रस्त विधान करणं टाळलं पाहिजे.
काय म्हणाले दिपक केसरकर
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेले विधान महाराष्ट्राचा अपमान करणारं आहे. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यांच्याबद्दल मुख्यमंत्री केंद्र सरकारला पत्र लिहितील. अशाप्रकारे पुन्हा विधानं होणार नाहीत असं केंद्र राज्यपालांना कळवू शकतो. मुंबईच्या विकासाठी सर्वांचे योगदान असलं तर मुंबईच्या विकासात सर्वाधिक वाटा मराठी माणसाचा आहे ही वस्तूस्थिती आहे अशा शब्दात शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी भाष्य केले आहे.