Amol Mitkari: खाज ठाकरे म्हणणाऱ्या अमोल मिटकरींना मनसेचं प्रत्युत्तर, थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 11:06 AM2022-04-21T11:06:10+5:302022-04-21T12:13:22+5:30
आपण कुणाला घाबरत नाही, त्यांची आणि भाजपची लावारीस कार्टी धमक्या देण्याशिवाय काही करू शकत नाही, असे म्हणत मनसेच्या ट्रोलर्संनाही मिटकरी यांनी टोला लगावला होता
मुंबई - मनसेप्रमुखराज ठाकरे यांच्यावर भाजपची बी टीम असल्याचा आरोप असतानाच राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा मनसेवर टिका केली आहे. विशेष म्हणजे मिटकरींनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीतच भाषण करताना, राज ठाकरेंचा उल्लेख खाज ठाकरे असा केला. त्यानंतर, आता मनसेकडून अमोल मिटकरींना थेट इशाराच देण्यात आला आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी नाव ने घेता मिटकरींना टोला लगावला आहे.
आपण कुणाला घाबरत नाही, त्यांची आणि भाजपची लावारीस कार्टी धमक्या देण्याशिवाय काही करू शकत नाही, असे म्हणत मनसेच्या ट्रोलर्संनाही मिटकरी यांनी टोला लगावला होता. सांगली जिल्ह्याच्या इस्लामपूर येथील सभेत बोलताना धनंजय मुंडे, अमोल मिटकरींनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला. त्यावर, आता मनसेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. संदीप देशपांडे यांनी अमोल मिटकरींचा मटणकरी असा उल्लेख करत, ही मटणकरी मनसैनिक कधी संपवून टाकतील हे कळणार पण नाही, असे म्हणत थेट इशाराच दिला आहे.
राष्ट्रवादीच्या गॅस वर तयार झालेल्या मटण करींनी जरा सांभाळून, ही मटण करी आमचे महाराष्ट्र सैनिक कधी संपवून टाकतील ते कळणार पण नाही. तेंव्हा चड्डीत राहायचं काय समजलं?
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 20, 2022
''राष्ट्रवादीच्या गॅसवर तयार झालेल्या मटण करींनी जरा सांभाळून. ही मटण करी आमचे महाराष्ट्र सैनिक कधी संपवून टाकतील ते कळणार पण नाही. तेव्हा चड्डीत राहायचे, काय समजलं?” असे ट्वीट संदीप देशपांडे यांनी केले आहे.
राज ठाकरेंची केली मिमिक्री
अमोल मिटकरी यांनी इस्लामपूरच्या सभेत भाजपसह मनसेवर जोरदार टिका केली. भाजपची बी टीम एमआयएम आम्ही ऐकलं होतं, आता भाजपची सी टीम आली आहे. राज ठाकरेंनी अगोदर मराठीचा मुद्दा उपस्थित केला. त्यासाठी, शिवाजी महाराजांचा मुद्दा उपस्थित केला, असे म्हणत मिटकरींनी राज ठाकरेंची नक्कलही करून दाखवली. तर, त्यांना खाज ठाकरे असे म्हटले. मनसेचा 5 रंगाचा झेंडा आता एका रंगावर आलाय. त्यावर राजमुद्रा आहे, पण त्यांच्याच पक्षाच्या एकाला मी राजमुद्रा विचारली, तर आम्हाला नाही विचारायचं असं त्यांनी म्हटल्याचा किस्साही मिटकरी यांनी सांगितला. 14 आमदारांवरुन तुमचा पक्ष 1 आमदारावर ऐऊन ठेपलाय, आता तर मुस्लीम मतदारही तुमच्याकडून दुरावलाय, असेही मिटकरींनी म्हटलं.
लाव रे तो व्हिडिओ
अमोल मिटकरींनी इस्लामपूरच्या सभेत लाव रे तो व्हिडिओचा प्रयोगही त्यांनी केला. त्यामध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवार यांनी मुंबईला अंडरवर्ल्डपासून कसं वाचवलं हे सांगितलं होतं. तर, दुसऱ्या व्हिडिओत अलटबिहारी वाजपेयी यांनी शरद पवार यांनी कच्छच्या भूकंपावेळी दिलेल्या योगदानाचं कौतूक केलं.