Join us

Amol Mitkari: वादावर मौन... अमोल मिटकरींनी संस्कृतच्या तीन शब्दातून स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 9:35 AM

अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाची आणि पुरोहित वर्गाची खिल्ली उडवल्याप्रकरणी एकीकडे राज्यभरात ब्राह्मण समाजाने त्यांचा निषेध केला आहे.

मुंबई/पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगली येथे केलेल्या सभेत हिंदू धर्माची प्रथा कन्यादान यावरुन वादग्रस्त विधान केले. त्यावरुन राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. अमोल मिटकरींनी माफी मागावी अशी मागणी ब्राह्मण महासंघाकडून केली जात आहे. पुण्यात ब्राह्मण महासंघानेराष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालयसमोर आंदोलन केले. मिटकरींच्या वक्तव्यावरुन चांगलाच गदारोळ माजला असताना, आता एका संस्कृत वाक्यात मिटकरींनी भूमिका व्यक्त केली.  

अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाची आणि पुरोहित वर्गाची खिल्ली उडवल्याप्रकरणी एकीकडे राज्यभरात ब्राह्मण समाजाने त्यांचा निषेध केला आहे. तर दुसरीकडे नवी मुंबईतील परशुराम सेवा संघाकडून वाशी पोलीस ठाण्यात अमोल मिटकरींविरोधात तक्रार नोंदवली आहे. अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाचा अपमान केल्याबद्दल त्यांच्यावर मानहानी आणि धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी परशुराम सेवा संघाकडून करण्यात आली आहे. मिटकरी यांनी जाहीर माफी न मागितल्यास तीव्र आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला आहे. या घटनेनंतर मिटकरी यांनी माफी मागणार नसल्याचं म्हटलं आहे. मात्र, ट्विटवरुन कायम मत मांडणारे मिटकरी याबाबत बोलताना मौन बाळगणंच श्रेष्ठ असल्याचं म्हणाले.  "वाचा मौनस्य श्रेष्ठम् ll...."असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे. म्हणजेच, आता वाणीला विराम देणं श्रेष्ठ असल्याचं मिटकरी यांनी सूचवलं आहे. सांगलीतील भाषणामुळे मिटकरींवर जोरदार टिका होत असून मनसेनंही त्यांना थेट इशाराच दिला आहे. 

जयंत पाटलांची दिलगिरी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. अमोल मिटकरींचं विधान योग्य नव्हतं. अमोल मिटकरी यांचं हे वैयक्तिक विधान होतं. कोणत्याही समाजाला दुखवण्याचा हेतू नव्हता. तसेच अमोल मिटकरी यांना सदर विधान करताना मी माइकवर टॅप करुन भाषण थांबविण्याची खूण केली होती, असा दावा देखील जयंत पाटील यांनी केला आहे. माझ्या उपस्थितीत सदर प्रकार घडल्याने मी याबाबत दिलगिरी व्यक्त करतो, असंही जयंत पाटील म्हणाले.

पुण्यात राष्ट्रवादीविरुद्ध ब्राह्मण महासंघ

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयाबाहेर आंदोलन केले. ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे व त्यांचे सहकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही आक्रमक झाल्याचे चित्र दिसून आले. दोघांमध्ये झटापट झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अमोल मिटकरी हे मूर्ख असून ते ब्राह्मण समाजाविरोधात बोलले आहेत असे आम्ही म्हणतच नाही. पण त्यांनी हिंदु धर्मातील एक मंत्र चुकीच्या पद्धतीने वापरला यावर आम्ही आक्षेप घेतला आहे. मी माझी बायको पुरोहिताला देत आहे असं त्यांनी म्हटलं होत. हे चुकीचं आहे. नमाजविरोधात मिटकरी असं बोलतील का? असा सवाल ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी यावेळी उपस्थित केला. त्यांनी हिंदु धर्माचं त्यांनी विडंबन केल्यामुळं आम्ही त्याचा निषेध आंदोलन केले आहे. असा कुठलाही मंत्र लग्नांमध्ये बोललाच जात नसल्याचेही ते यावेळी म्हणाले 

टॅग्स :पुणेराष्ट्रवादी काँग्रेसब्राह्मण महासंघ