ZP Election Results 2021: “महाविकास आघाडी एकत्र राहिली नाही तर भाजपला रोखणे कठीण होईल”; अमोल मिटकरींची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 03:26 PM2021-10-06T15:26:40+5:302021-10-06T15:28:03+5:30
ZP Election Results 2021: महाविकास आघाडी एकत्र राहिली नाही तर भाजपला रोखणे कठीण होईल, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
मुंबई: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षांचे भवितव्य ठरणार आहे. यातच अकोला जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत अकोट तालुक्यातील कुटासा येथील लढत चांगलीच गाजली. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांना मोठा धक्का बसला आहे. अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवार स्मृती गावंडे विजयी झाल्या आहेत. यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना महाविकास आघाडी एकत्र राहिली नाही तर भाजपला रोखणे कठीण होईल, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. (amol mitkari react on zp election result that difficult to stop bjp without maha vikas aghadi together)
कुटासा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांचे गाव आहे. आमदार झाल्यापासून अमोल मिटकरी यांनी कुटासा गावातच सर्वाधिक निधी दिल्याचे समजते. यामुळे येथील निवडणूक ही मिटकरी यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती. येथे आमदार मिटकरी आणि पालकमंत्री बच्चू कडू यांच्यात थेट सामना बघायला मिळाला. मात्र, प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवार स्मृती गावंडे विजयी झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसकडून छबुताई राऊत यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत महाविकासआघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता.
महाविकास आघाडीने गांभीर्याने घेणे आवश्यक
महाविकास आघाडीची बेरीज भाजपपेक्षा सरस आहे. मात्र इथून पुढे सर्वांनी विशेषता महाविकास आघाडीने गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. महाविकास आघाडीने आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. सर्वांनी एकत्र येऊन भाजपला रोखले पाहिजे, स्वतंत्र गेलो तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण पुढे जाऊ शकत नाही. महाविकास आघाडीने एकत्र येणे आवश्यक आहे. स्वबळावर लढलो तर भाजपला यश मिळत राहील. महाविकास आघाडी एकत्र आली नाही तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा महानगरपालिकांच्या निवडणुकीत आपण यश मिळवू शकणार नाही, असेही अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
दुर्दैवाने आमचा पराभव झाला
बच्चू कडूंनी भाजपसोबत छुपी युती केली. त्यामुळे महाविकास आघाडीला फटका बसला. त्याची दखल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घ्यावी, अशी मागणी मिटकरी यांनी यावेळी केली. दुर्दैवाने आमचा पराभव झाला. भाजपची मते प्रहारने खेचली. अकोल्यात ग्रामीण भागात राष्ट्रवादीची कामगिरी चांगली आहे. माझ्या सर्कलमध्ये पराभव झाला असला तरी ग्रामीण भागात फार मोठे यश मिळाले. आगामी काळात महाविकास आघाडीतील पक्षांनी एकत्र राहणे गरजेचे आहे, या मतावर ठाम असल्याचे मिटकरी यांनी सांगितले. ते टीव्ही९ शी बोलत होते.