Join us

मिटकरी म्हणाले, अज्ञात कोणीतरी आहे तिथे; शर्ट निळा, ओळखण्यात झाला घोटाळा, व्यक्त केली दिलगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 6:12 AM

विधान परिषदेत अज्ञात व्यक्ती घुसल्याच्या आमदार अमोल मिटकरींच्या तक्रारीने एकच खळबळ उडाली.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : विधान परिषदेत अज्ञात व्यक्ती घुसल्याच्या आमदार अमोल मिटकरींच्या तक्रारीने एकच खळबळ उडाली. न्यूज चॅनेल्सवर बातमीही झळकली. मात्र, प्रत्यक्षात ही व्यक्त दुसरी-तिसरी कोणी नसून भाजपचे आमदार रमेश कराड असल्याचे निदर्शनास आले. 

त्यानंतर मात्र मिटकरींना सत्ताधारी पक्षातील आमदारांनी घेरले.  मिटकरी प्रसिद्धीसाठी असे प्रकार करतात. त्यांनी सभागृहाची माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली. विरोधकांचा पवित्रा पाहून नमते घेत मिटकरी यांनी यापुढे असे होणार नाही याची काळजी घेईन, अशी दिलगिरी व्यक्त केली. 

सभागृहात सहकारी आमदाराला ओळखण्यात  घोटाळा झाल्याने  मिटकरी यांनी थेट उपसभापती नीलम गोऱ्हे यांनाच शुक्रवारी एक पत्र पाठवले. त्यात निळा शर्ट, गोल टिळा लावलेली अज्ञात व्यक्ती सभागृहात बसली असून याबाबत खातरजमा करण्याची मागणी  केली. अखेर विधिमंडळ सचिवालयाने सीसीटीव्ही फुटेज शोधल्यानंतर ही अज्ञात व्यक्ती म्हणजे भाजपाचे आमदार रमेश कराड असल्याचे दिसून आले. त्याची माहिती गोऱ्हे यांनी सोमवारी सभागृहात दिली.

चॅनेलवर झळकलेली ‘ती’ व्यक्ती सरपंच

- मिटकरींनी पाठवलेल्या पत्राची माहिती माध्यमांपर्यंत पोहोचली. विधानमंडळातील लिफ्टजवळ उभ्या असलेल्या निळ्या शर्टातील एका व्यक्तीचा फोटोही चॅनेलवर झळकू लागला. त्यामुळे विधिमंडळ सचिवालयाने शोध सुरू केला. 

- अखेर, सभागृहात बसलेली व्यक्ती आमदारच असल्याचे निष्पन्न झाले. शिवाय, लिफ्टजवळील ज्याचे फोटो व्हायरल झाले ते एका गावचे सरपंच होते, मात्र सभागृहात आले नव्हते.

अन्य दोन आमदारही निळ्या शर्टमध्येच 

अमोल मिटकरी यांनी यावर खुलासा करताना ही बातमी आपण माध्यमांना दिली नाही, असे सभागृहाला सांगितले. त्या दिवशी कराड यांना ओळखू शकलो नाही. माझ्या शेजारच्या सहकाऱ्यांना विचारले असता तेही आ. कराडांना ओळखू शकले नाहीत. शिवाय, त्या दिवशी श्रीकांत भारतीय, ज्ञानेश्वर म्हात्रे हेसुद्धा निळ्या शर्टात होते. पण, यापुढे काळजी घेण्याची ग्वाही मिटकरी यांनी दिली नि वादावर पडदा पडला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :अमोल मिटकरीअर्थसंकल्पीय अधिवेशन