मुंबई - एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे आमदार आणि मंत्र्यांनी पुकारलेल्या बंडाला आज पाच दिवस होत आहे. या बंडामुळे शिवसेना फुटीच्या मार्गावर आहे. तर शिवसेनेमुळे सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेही सत्ता जाण्याच्या भीतीने चिंतेत आहेत. महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूर गुवाहाटीमध्ये जाऊन शिंदेंच्या नेतृत्वाखालील बंडखोर ठाकरे आणि महाविकास आघाडीला आव्हान देत आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदेंसोबत बंड करून सध्या गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये राहत असलेल्या बंडखोर आमदारांना गुंगीचं औषध दिलं जात असल्याचा धक्कादायक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदारांच्या एका व्हिडीओचा संदर्भ घेत अमोल मिटकरी यांनी हा आरोप केला आहे. त्यात अमोल मिटकरी म्हणाले की, तुम्हाला शिवसेनेला खरंच चॅलेंज करायचं होतं तर तुमचं बलस्थान असलेल्या ठाणे, पालघर या भागातून तुम्ही आव्हान दिलं पाहिजे होतं. तुम्ही सूरतला गेलात, तिथे सत्ता भाजपाची. सूरत महाराष्ट्रापासून जवळ, आमदार कधीही पळून जातील. म्हणून तिथून तुम्ही पोहोचलात गुवाहाटीमध्ये.
आसाममध्येही भाजपाचंच सरकार. जिथे हे आमदार ठेवले आहेत. त्या हॉटेलभोवती दोन हजार पोलिसांचा गराडा आहे. अनेक आमदारांचे आम्हाला फोन येतात. तिथे काही आमचेही मित्र आहेत. त्यातील एकाने सांगितलं की, आम्हाला जेवल्यानंतर काही सूचत नाही. काल एकनाथ शिंदे समोर बसलेले असताना एकनाथ शिंदेंचा विजय असो अशा घोषणा दिल्या जात होत्या. त्यावेळी काही आमदारांचे हात खाली होते. तेव्हा मी याबाबत मानसोपचार तज्ज्ञ असलेल्या डॉक्टरांना विचारलं. ते म्हणाले की, त्यांना स्मरणात राहत नसावं. तसेच त्यांना जेवणामधून झोपेच्या गोळ्या वगैरे दिल्या जातात का याचा शोध घेतला पाहिजे. जेवणानंतर एकत्र आल्यावर या आमदार मंडळींना भान राहत नाही. आपण काय बोलावं हे त्यांना सूचत नाही. ही बाब खूप गंभीर आहे, असे अमोल मिटकरी म्हणाले.
आमदारांच्या जीवाला धोका उत्पन्न होईल, अशी परिस्थिती आसाममध्ये असेल. त्यांच्या जेवणामध्ये काही काळंबेरं असेल. तर याचा विचार आमदारांच्या कुटुंबांनी गांभीर्यानं विचार केला पाहिले, असा सल्लाही त्यांनी आमदारांच्या कुटुंबीयांना दिला.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी निधीवाटपात कधी दुजाभाव केला का, याबाबत आमदार संजय शिरसाट यांनी त्यांच्या छातीवर हात ठेवून खरं काय ते सांगावं. कोरोना काळात आमदार विकास निधी ३ कोटींवरून पाच कोटींपर्यंत वाढवला. पण तुम्ही त्याबाबत कधी आभाराचे दोन शब्द बोलला नाही, असा टोला त्यांना आमदार शिरसाट यांना लगावला.