मुंबई - हिंदी-मराठी सिनेसृष्टीमध्ये अभिनयासोबतच दिग्दर्शनासाठी प्रसिद्ध असलेले अमोल पालेकर यांची चित्रकला आणि चित्रे यांची नेहमीच चर्चा रंगते. लवकरच मुंबईकरांना त्यांची चित्रे पाहायलाही मिळणार आहेत. जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये अमोल पालेकरांच्या ‘थ्रू द रॅडियन्स’ या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.
अमोल पालेकर आणि त्यांच्या चित्रकलेबाबत जाणून घेण्याची त्यांच्या चाहत्यांना कायम उत्सुकता असते. आता मुंबईकरांना त्यांच्या कुंचल्यातून कॅनव्हासवर अवतरलेली चित्रे आणि त्यांच्या रंगांचे फटकारे पाहण्याची संधी मिळणार आहे. १५ ते २० नोव्हेंबरदरम्यान जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये पालेकरांच्या ‘थ्रू द रॅडियन्स’ या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात ५० तैलचित्रांचा समावेश असेल. पाहणाऱ्याशी संवाद साधण्याची शक्ती अमूर्त चित्रकलेत असते, पण अमूर्ताला अवघड आणि अनाकलनीय मानून त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते. मनातील हा पूर्वग्रह बाजूला सारून वास्तवाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न पालेकरांनी आपल्या चित्रांद्वारे केला आहे. ‘थ्रू द रॅडियन्स’ हे प्रदर्शन कलाप्रेमींनी अशीच काहीशी अनुभूती देणारे ठरणार आहे. अभिनयासोबतच दिग्दर्शनातही नाव कमावलेले अमोल पालेकर हे जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी आहेत. चित्रकलेचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी सुरुवातीच्या काळात चित्र प्रदर्शने भरवली होती. नंतरच्या काळात अपघाताने अभिनयाकडे वळलेल्या पालेकरांची चित्रकला काहीशी झाकोळली गेली, जी पुन्हा प्रकाशझोतात आणण्याचे काम ते करत आहेत. ‘थ्रू द रॅडियन्स’ या चित्र प्रदर्शनात कलाप्रेमींना पालेकरांच्या संकल्पनेतील अनोख्या चित्रांचे दर्शन घडणार आहे.