Join us

अमोल यादवच्या उड्डाणाला डीजीसीएमुळे लागला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 5:51 AM

मुंबईतील मराठमोळ्या वैमानिकाने स्वत: झटून सन २०११ मध्ये सहा आसनी विमान तयार केले होते,

- खलील गिरकर मुंबई : मुंबईतील मराठमोळ्या वैमानिकाने स्वत: झटून सन २०११ मध्ये सहा आसनी विमान तयार केले होते, पण या विमानाला हवेत उडविण्याची डीजीसीएची परवानगी अद्याप मिळालेली नसल्याने, या वैमानिकासमोर निराशेचे काळे ढग दाटू लागले आहेत.खासगी विमान कंपनीत वैमानिक असलेल्या कॅप्टन अमोल यादव यांनी तयार केलेल्या विमानाला उड्डाणाची परवानगी मिळविण्यासाठी नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडे (डीजीसीए) त्यांनी हेलपाटे घातले आहेत. डीजीसीएकडून त्यांनी तयार केलेल्या विमानाची वारंवार तपासणी केली जाते. मात्र, अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही, असे त्यांनी सांगितले. १२ सप्टेंबर रोजी डीजीसीएच्या पथकाने पुन्हा एकदा भेट देऊन पाहणी केली. मात्र, अद्याप त्याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. यादव यांनी पैसे जमवून पाच कोटी रुपये खर्चून सहा आसनी विमान निर्मिती केली. सध्या धुळे विमानतळावर हे विमान ठेवण्यात आले आहे. त्यासाठी त्यांना दर महिन्याला ४ लाख रुपये देखभाल खर्च करावा लागत आहे.फेब्रुवारी, २०१८ मध्ये महाराष्ट्र सरकारने कॅप्टन यादव यांच्यासोबत सामंजस्य करार करून १९ आसनी विमानांच्या निर्मितीसाठी त्यांना पालघर येथे १५७ एकर जमीन देण्याचा निर्णय घेतला होता.सन २०१६ मध्ये मेक इन इंडियामध्ये यादव यांचे विमान जनतेसमोर आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले होते. यादव यांनी त्यांच्या विमानाची २०१७ मध्ये नोंदणी केली. त्याचे नाव व्हीटी नरेंद्र मोदी देवेंद्र (व्हीटी एनएमडी) असे ठेवण्यात आले. विमान उड्डाणासाठी लँडिंग गिअरसाठी विचारणा केली गेली असून, त्यासाठी ५० लाख खर्च येण्याची शक्यता आहे. मात्र, डीजीसीएकडून त्यानंतर परवानगी मिळेल, याची खात्री नसल्याचा मुद्दा यादव यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केला आहे.>मला विमान बनवता येते, त्यामुळे विमान बनविले आहे. उड्डाणाची परवानगी देण्याचा अधिकार डीजीसीएचा आहे. मात्र, उड्डाणासाठी डीजीसीएकडून अजिबात सहकार्य मिळत नाही, उलट अडवणूक केली जात आहे. अनावश्यक बाबींचा आक्षेप घेऊन उड्डाण रखडविले जात आहे. पालघर येथे विमान निर्मितीचा कारखाना तयार करण्याबाबत मुख्यमंत्री इच्छुक आहेत. मात्र, विमानाच्या उड्डाणाला परवानगी मिळाल्याशिवाय इतर बाबी पुढे जाऊ शकत नाहीत.- कॅप्टन अमोल यादव