राज्यात १ लाख महिलांमध्ये २,१२६ महिलांना थायरॉईड; जे. जे. रुग्णालयात मिळणार आता मोफत उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 11:26 AM2023-04-09T11:26:57+5:302023-04-09T11:28:42+5:30
आठ दिवसांपूर्वी सरकारच्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयात ‘मिशन थायरॉईड अभियान’ सुरू करण्यात आले आहे.
मुंबई :
आठ दिवसांपूर्वी सरकारच्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयात ‘मिशन थायरॉईड अभियान’ सुरू करण्यात आले आहे. याअंतर्गत दर गुरुवारी दुपारी १२ वाजता थायरॉईडच्या उपचाराकरिता स्वतंत्र ओपीडी सुरू करण्यात आले आहे. तसेच या आजारावरील संपूर्ण उपचार मोफत करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण - ५ नुसार महाराष्ट्रात १ लाख महिलांमधील २ हजार १२६ महिलांमध्ये थायरॉईडचे प्रमाण आढळून येते.
थायरॉईडबाबत आजही अनेक महिला अनभिज्ञ आहेत. जोपर्यंत दृश्य स्वरूपात मानेवरची गाठ दिसत नाही तोपर्यंत अनेक महिला हा आजार गंभीरपणे घेत नाहीत. त्याचप्रमाणे अनेक महिलांना थायरॉईडची गाठ मानेवर दिसत नसतानाही विविध थायरॉईडचे आजार झालेले आहेत. त्यातील थायरॉईडच्या आजारांचे दीर्घकाळापर्यंत निदानही होत नाही. महिलांमध्ये दिसत असला तरी काही प्रमाणात पुरुषांनाही हा आजार होतो.
या आजाराची लक्षणे
अनेकदा थायरॉईडच्या रोगांनी ग्रस्त महिला, पुरुषांना आळस, सुस्तपणा, शरीरावर सूज येणे, भूक न लागताही वजन वाढणे, आवाजात एक प्रकारचा जाडपणा अथवा घोगरेपणा येणे ही लक्षणे थायरॉईड ग्रंथींचे काम मंदावल्याचे दर्शवितात.
अनेकदा अशा महिलांना वारंवार गर्भपाताला सामोरे जावे लागते.
नवजात बालकांमध्ये थायरॉईड ग्रंथींच्या स्त्रावाअभावी मानसिक दुर्बल्य येऊन अशी बालके लहान खुरी व दिव्यांगही होऊ शकतात.
थायरॉईड ग्रंथींच्या अतिस्रावामुळे अतिजास्त रोडपणा, छाती धडधड होणे व क्वचितप्रसंगी डोळे बाहेर येणे किंवा अंधत्वही येऊ शकते.
महिलांनो, कशी घ्याल काळजी?
महिलांनी व्यवस्थित आहार घेऊनही वजन वाढत नसेल किंवा अनेक वेळा आहारावर नियंत्रण ठेवूनही वजन वाढत असेल तर अशा वेळी वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने या आजाराची चाचणी करून वेळेवर उपचार घेतले पाहिजेत.
आहारात आयोडिनयुक्त मिठाचा वापर केला पाहिजे. आयोडिन हे शरीरातील हार्मोन्सची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते. आयोडिनचे नियमित सेवन केल्यास थायरॉईडवर नियंत्रण मिळवणे अधिक सोपे जाते. आयोडिन मिळविण्याचे नैसर्गिक स्रोत म्हणजे फळे आणि भाज्या खाणे.
नववी-दहावीच्या मुलींना धोका
सर्वसाधारणपणे या वयात मुलींमध्ये मासिक पाळीला सुरुवात होते. त्या काळात हार्मोन्समध्ये बदल होतात. जर मासिक पाळी वेळेत येत नसेल तर त्या मुलींनी एकदा थायरॉईडची चाचणी करावी. मासिक पाळी नियमितपणे न येण्याचे एक कारण म्हणजे थायरॉईड आहे.
एकाच ओपीडीमध्ये सगळे तज्ज्ञ
मिशन थायरॉईड या अभियानाचे उद्दिष्ट थॉयराईड रोगासंदर्भात जनजागृती करणे व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विविध सोयी उपलब्ध करून देणे हे आहे. औषधवैद्यकशास्त्र विभागाअंतर्गत ही विशेष थायरॉईड ओ.पी.डी. चालविली जाणार आहे. फिजिशियन, सर्जन, हार्मोन्सतज्ज्ञ, पॅथॉलॉजिस्ट, सोनोलॉजिस्ट यांचा समावेश असेल.
गेल्या आठवड्यातच या आजारावरील स्वतंत्र ओपीडी तयार करण्यात आली आहे. महिनाभरानंतर पूर्ण राज्याचा आढावा घेऊन किती महिलांनी या ओपीडीचा लाभ घेतला हे लक्षात येईल. रुग्णालयातही अशा स्वरूपाची ओपीडी सुरू झाली आहे. या आजाराची स्वतंत्र ओपीडी असल्याने महिलांना सर्वसाधारण रांगेत उभे राहण्याची गरज नाही.
- डॉ. श्रीनिवास चव्हाण, राज्य समन्वयक, मिशन थायरॉईड अभियान