Join us

वाहतूक समस्येवर सल्लागाराची मात्रा

By admin | Published: May 24, 2014 1:17 AM

स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांच्या पुढाकाराने पालिका अधिकारी, वाहतूक शाखा आणि महावितरणचे अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली़ यात वाहतूककोंडी आणि खंडित होणार्‍या वीजपुरवठ्यावर चर्चा करण्यात आली.

कल्याण : शहरातील वाहतूक समस्येवर उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने सल्लागाराची नेमणूक करून त्याच्या अहवालावरून वाहतूक आराखड्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय शुक्रवारी कल्याण-डोंबिवली महापालिकेत पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांच्या पुढाकाराने पालिका अधिकारी, वाहतूक शाखा आणि महावितरणचे अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली़ यात वाहतूककोंडी आणि खंडित होणार्‍या वीजपुरवठ्यावर चर्चा करण्यात आली. शहरातील बहुतांश ठिकाणी रस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत, तर टेलिफोन आणि महावितरण कंपन्यांनी खोदलेल्या रस्त्यांचे खडीकरण आणि डांबरीकरणाचे काम सुरू आहे. वाहतूककोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच डोंबिवली शहरात विजेच्या सुरू असलेल्या लपंडावामुळे नागरिकांमध्ये रोषाचे वातावरण असून या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी म्हात्रे यांनी संयुक्त बैठक बोलवली होती. यावेळी माजी सभापती प्रकाश पेणकर यांच्यासह वाहतूक शाखेचे साहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब पवार, साहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, महावितरणचे सुभाष बनसोड, व्ही. एन. गोनाडे, केडीएमसीचे शहर अभियंता पी. के. उगले, कार्यकारी अभियंता दीपक भोसले, रवींद्र जौरस, तरुण जुनेजा आदी उपस्थित होते. वाहतूक पोलिसांकडून सुरू असलेल्या रस्त्यांच्या संथगती कामांबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. वाहतूक सुरळीत होण्यासाठी शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील मार्ग ‘एकदिशा’ करा, बंद असलेली सिग्नल यंत्रणा सुरू करा, फेरीवाल्यांवर कारवाई करा, आवश्यक त्या ठिकाणी रस्त्यावर दुभाजक बसवा, सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी सूचना फलक लावा, अशा सूचना करताना २५ मेपासून खोदकाम बंद करणे, असेही अधिकार्‍यांना बजावण्यात आले.