लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भारत सरकारच्या निर्देशानुसार २०२१-२०२२ च्या शैक्षणिक वर्षाच्या उन्हाळ्याच्या सुटीच्या काळातील पोषण आहाराची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्याचा निर्णय शिक्षण संचालनालयाने घेतला आहे. मात्र, निम्म्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे बँकेत खाते नाही; ज्यांचे आहे त्या खात्यात व्यवहार नसल्याने दंड हाेऊ शकताे. यामुळे ही योजना रेंगाळण्याची भीती शिक्षकांनी व्यक्त केली.
या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांचे खाते नसल्यास बँक खाते उघडावे. ते आधारशी लिंक करावे, असे आदेश शिक्षण संचालनालयाने शाळांना दिले. आधार कार्ड लिंक करून १ जुलै, २०२१ पर्यंत बँक खात्याची सर्व माहिती अद्ययावत करायची आहे आहे. दुसरीकडे अल्पसंख्याक, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीसह अन्य शिष्यवृत्ती जमा करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून शिक्षकांनी खाते उघडले. मात्र, खात्यात किमान सहा महिन्यांतून एकदा व्यवहार होत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे खाते बंद झाले. किमान शिल्लक नसल्याने दंड होताे. त्यामुळे नवीन रक्कम जमा हाेताच सर्वप्रथम दंड आकारल्याने लाभार्थ्यांचे नुकसान होऊ शकते. यामुळे पालकांच्या रोषाचा सामना करावा लागेल, असे शिक्षकांचे म्हणणे आहे.उन्हाळी सुटीच्या दोन महिन्यांतील अंदाजित ३५ दिवस गृहीत धरल्यास पहिली ते पाचवीसाठी दरदिवशी ४.४८ रुपये प्रमाणे एकूण फक्त १५६ रुपये ८० पैसे आणि सहा ते आठसाठी दर दिवशी ६.७१ रुपये प्रमाणे एकूण फक्त २३४ रुपये ८५ पैसे जमा हाेतील. एवढ्या कमी रकमेसाठी बॅंक खाते सुरू ठेवणे गरीब विद्यार्थ्यांसाठी अवघड हाेणार असल्याचे मत शिक्षक, मुख्याध्यापकांनी मांडले.
वेठीस धरणे चुकीचेपोषण आहाराची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. वयाच्या अटीमुळे काही विद्यार्थ्यांचे खाते उघडता येत नाही; तर काहींचे व्यवहाराअभावी बंद आहे. अनेक खात्यांना आधार कार्ड लिंक नाही. यासाठी शिक्षकांना वेठीस धरण्यात येणार असून हे चुकीचे आहे. - विजय कोंबे, राज्य सरचिटणीस, शिक्षक प्राथमिक समिती.