मुंबई : योगासनांचे मानवी शरीराला असंख्य फायदे आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये योगासनांबद्दल मोठ्या प्रमाणावर जनजागृती निर्माण झाली आहे. लॉकडाऊनमुळे दिवसभर घरात बसून राहणे, तसेच वर्क फ्रॉम होम यामुळे शरीराची हालचाल जवळपास थांबली आहे. यामुळे नागरिक योगासनांना प्राधान्य देत आहेत.
शरीराचा व्यायाम व्हावा, या उद्देशाने दिवसातून किमान दोनदा तरी नागरिक योगासने करू लागली आहेत. त्या योगासनांमध्ये प्राणायामला विशेष महत्त्व दिले जात आहे. सध्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ऑक्सिजन लेवलची कमी मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. परिणामी, सर्व रुग्णालयांमधील ऑक्सिजन बेड शोधण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना धावाधाव करावी लागत आहे. कोरोनाच्या काळात शरीरातील ऑक्सिजन लेवल चांगली राहावी, यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणून नागरिक प्राणायामला या योग प्रकाराला प्राधान्य देत आहेत.
नियमित प्राणायाम केल्याचे फायदे
प्राणायाम केल्याने शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण योग्य स्थितीत राहते, फुप्फुस निरोगी राहते, पोटातील जळजळ कमी होते, नाक आणि छातीचे आजार कमी होतात, शरीरात योग्य गरमी राहते, शरीरातील नाड्या शुद्ध राहतात, वात, पित्त आणि कफ कमी होण्यास मदत होते, त्यामुळे रक्त शुद्ध राहते व मनातील एकाग्रता वाढते.
सारिका गौडा (योग प्रशिक्षक) - भारतीय संस्कृतीत योगासनांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या आधी नागरिकांना योगासने करण्यासाठी विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत होती. मात्र, आता कोरोनामुळे योगासनांचे महत्त्व नागरिकांना समजले आहे. त्यामुळे प्रत्येक जण योगासन करत आहे. त्याचप्रमाणे, ऑनलाइन योगासने प्रशिक्षणाची मागणीही वाढली आहे.
हिमांशू पाटील (योग प्रशिक्षक) - कोरोनाच्या काळात नागरिकांचे घराबाहेर पडणे कमी झाले आहे. त्यामुळे घरबसल्या योगासन हा उत्तम पर्याय आहे. योगासनांमुळे कमी जागेत शरीराचा चांगल्या प्रकारे व्यायाम होतो. विशेषतः प्राणायाम केल्याने शरीरातील रक्ताभिसरण श्वासोच्छवास चांगल्या प्रकारे होतो. मानसिक संतुलन योग्य राखण्यासही प्राणायाम मदत करते.
सुयोग खंडागळे - शाळेत असल्यापासून मी नियमित प्राणायाम करतो. यामुळे मला विविध आजारांवर मात करण्यासाठी मदत झाली आहे. माझ्या कुटुंबातील व्यक्तींनाही नियमित प्राणायम करण्यासाठी मी आग्रही असतो.
प्रदीप केणी - कोरोना काळात मला प्राणायामचे महत्त्व समजले आहे. यासाठी दररोज इंटरनेटवरून व्हिडीओ पाहून मी प्राणायाम करतो. यामुळे माझी ऑक्सिजन लेवलही चांगली राहत आहे.