Join us

एसटी तिकिटांची रक्कम केंद्र चालकाच्या घशात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2019 6:18 AM

सुमारे दीड वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकारात एसटीच्या तिकिटांच्या तब्बल ४० लाख रुपयांहून अधिक रकमेचा अपहार झाल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

चेतन ननावरे मुंबई : एसटी महामंडळाच्या तिकिटांचे बुकिंग करणाऱ्या खासगी आरक्षण केंद्र चालकाने एसटीच्या तिकिटांची रक्कम घशात घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुमारे दीड वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकारात एसटीच्या तिकिटांच्या तब्बल ४० लाख रुपयांहून अधिक रकमेचा अपहार झाल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी एसटी प्रशासनाने तीन कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई केली असून, संबंधित प्रकाराच्या चौकशीसाठी एक समितीही नेमली आहे.

एसटी महामंडळातील एका वरिष्ठ अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार, वित्तीय सल्लागार, लेखा अधिकारी, मुख्य लेखाधिकारी, व्यवस्थापक (वित्त), व्यवस्थापक (लेखा) यांनी या प्रकाराचा तपास केला आहे, तसेच अधिक चौकशीसाठी महामंडळाने लेखा अधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे. एसटी प्रशासनाने केलेल्या आॅडिटमध्ये हा अपहार समोर आला आहे. एसटीच्या तिकिटांचे आरक्षण करणाºया केंद्र चालकांनी रोज जमा होणारी रक्कम दुसºया दिवशी बँक खात्यात भरायची असते, तसेच संबंधित रक्कम भरल्याची पावती एसटी डेपोमध्ये जमा करायची असते. गेल्या सात वर्षांपासून आरक्षण केंद्र चालविणाºया अर्जुन मांडे या केंद्र चालकाने इथेच घोळ घातल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित चालकाने बँकेत पैसे जमा केलेच नाही, तसेच बनावट पावत्या डेपोमध्ये जमा केल्या. तपासण्यांचे काम डेपो आणि कार्यालयातील लिपिकासह अकाउंटंटने केले नाही. त्यामुळे मे, २०१७पासून हा अपहार सातत्याने सुरू होता. मात्र, लेखा परीक्षण अहवालात ही बाब उघड होताच प्रशासनाला धक्का बसला. याची गंभीर दखल घेत एसटीने तातडीने तीन कर्मचाºयांचे निलंबन केले आहे, तसेच या प्रकरणी नागपाडा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 

टॅग्स :मुंबई