रेल्वे कर्मचाऱ्याने परत केली साडेतीन लाखांची रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 04:23 AM2018-07-08T04:23:21+5:302018-07-08T04:25:47+5:30
मुंबई सेंट्रल कारशेड येथे पब्लिक इम्फोर्मेशन सेक्शनमध्ये कार्यरत असलेल्या सतीश पवार यांना शुक्रवारी रात्री ३ लाख ५७ हजार रुपये रोख रक्कम असलेली बॅग लोकलमध्ये सापडली.
मुंबई - मुंबई सेंट्रल कारशेड येथे पब्लिक इम्फोर्मेशन सेक्शनमध्ये कार्यरत असलेल्या सतीश पवार यांना शुक्रवारी रात्री ३ लाख ५७ हजार रुपये रोख रक्कम असलेली बॅग लोकलमध्ये सापडली. मात्र, त्यांनी प्रामाणिकपणे ती बॅग स्टेशन मास्तर कार्यालयात जमा केली. संपूर्ण तपासानंतर बॅग संबंधितापर्यंत पोहोचवण्यात आली.
पवार हे माटुंगा रेल्वे वसाहतीत राहतात. रात्रपाळीला निघताना माटुंगा रेल्वे स्थानकावरून त्यांनी रात्री १०.१६ वाजताची लोकल (क्रमांक ५०६५-५०६६) पकडली. महालक्ष्मी येथे पोहोचल्यानंतर त्यांना डब्यात एक बॅग दिसली. त्यांनी इतर प्रवाशांना या बॅगबाबत विचारले. परंतु, उपस्थित प्रवाशांमधील कोणाचीच ती नव्हती. त्यानंतर त्यांनी मुंबई सेंट्रल स्थानकावरील स्टेशन मास्तर कार्यालयात ती बॅग जमा केली. त्या वेळी, स्टेशन मास्तर व आरपीएफ पोलिसांना बॅगेत मोठी रक्कम आढळून आली.
बोरीवली येथे राहणाºया देवांग शहा यांची ती बॅग असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, संपूर्ण तपास करून शहा यांना रोख रक्कम सुपुर्द करण्यात आली.