आमदार रवी राणा यांच्या अडचणीत वाढ; विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावरच वॉरंट जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 11:17 PM2022-06-18T23:17:53+5:302022-06-18T23:18:58+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. हे वॉरंट घेऊन आज अमरावती पोलीस रवी राणा यांच्या मुंबईतील खार येथील घरी पोहोचले होते. मात्र, राणा यांच्या घरी कुणीच नसल्याने पोलिसांना तसेच माघारी परतावे लागले आहे.
मुंबई- राज्यात विधान परिषद निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापले आहे. सर्वच पक्ष या निवडणुकीसाठी आमदारांची जुळवाजुळव करताना दिसत आहेत. याच वेळी आता हनुमान चालिसा प्रकरणावरून चर्चेत आलेले अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. हे वॉरंट घेऊन आज अमरावती पोलीस रवी राणा यांच्या मुंबईतील खार येथील घरी पोहोचले होते. मात्र, राणा यांच्या घरी कुणीच नसल्याने पोलिसांना तसेच माघारी परतावे लागले आहे.
खरे तर, रवी राणा यांच्यावर बाजारपेठ पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. या गुन्हासंदर्भात ते तारखेसाठी न्यायालयात हजर राहू न शकल्याने न्यायालयाने हे वॉरंट जारी केल्याचे समजते.
काय आहे नेमके प्रकरण?
गेल्या फेब्रुवारी महिन्यात अमरावती महापालिकेने छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा हटवला होता. यामुळे संतप्त झालेल्या युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी अमरावती येथील राजापेठ येथे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाई फेकून त्यांचा निषेध केला होता. याप्रकरणी अमरावती पोलिसांनी आमदार राणांविरुद्ध कलम ३०७ आणि कलम ३५३ अंतर्गत गुन्हे दाखल केले होते.
याप्रकरणी रवी राणा यांना अमरावती येथील जिल्हा व सत्र न्यायालयातून अटकपूर्व जामीनही मिळवला आहे. पण अमरावती पोलिसांनी त्यांचा अटकपूर्व जामीन रद्द करण्यात यावा, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.