...तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही, आशिष शेलारांचं नवाब मलिकांना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 05:58 PM2021-11-15T17:58:41+5:302021-11-15T17:59:36+5:30
त्रिपुरातील घटनेचे महाराष्ट्रात पडसाद पाहायला मिळाले. अमरावतीतील दंगलीनंतर आता जोरदार राजकारण देखील सुरू झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दंगलीसाठी मुंबईहून पैसा पुरवण्यात आल्याचा आरोप केला आहे.
मुंबई
त्रिपुरातील घटनेचे महाराष्ट्रात पडसाद पाहायला मिळाले. अमरावतीतील दंगलीनंतर आता जोरदार राजकारण देखील सुरू झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दंगलीसाठी मुंबईहून पैसा पुरवण्यात आल्याचा आरोप केला आहे. तर भाजपा आमदार आशिष शेलार यांच्यावरही गंभीर आरोप केले. आशिष शेलार यांचा एक फोटो दाखवत शेलार रझा अकादमीच्या नेत्यांसोबत काय करत होते? हा षडयंत्राचाच भाग होता का? असा सवाल उपस्थित केला. नवाब मलिकांच्या आरोपाला आता आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
आशिष शेलार यांनी ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी नवाब मलिकांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. "नवाब मलिक यांना मी मराठीतील ती म्हण पूर्ण सांगणार नाही. पण तुमची खोड काही जात नाही एवढं मात्र खरं. अशापद्धतीनं दरवेळी वेगवेगळ्या फोटोंच्या जीवावर अफवांचं राजकारण करणं हा तुमचा धंदा आहे. त्रिपुराच्या घटनेनंतर महाराष्ट्रात घडलेल्या दंगलीचा आणि २०१६-१७ सालच्या फोटोचा काय संबंध?", असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.
रझा अकादमीसोबतचे तुमचे सगळ्यांचे आम्ही फोटो दाखवले तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही! | @BJP4Maharashtra@Dev_Fadnavis@ChDadaPatilpic.twitter.com/1s9vw7jKKn
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 15, 2021
नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यात झालेल्या दंगलीबाबत भाजपावर गंभीर आरोप केले. आशिष शेलार रझा अकादमीच्या कार्यालयात बसले होते. बैठक घेत होते. माझ्याकडे त्याचा एक फोटो आला आहे. आता हा सुद्धा षटयंत्राचा भाग होता का ते माहित नाही. राज्यात रझा अकादमीची ताकद नाही. त्यांचे काही मौलाना शहरात फिरत असतात. पण दंगल भडकवतील एवढी ताकद त्यांची नाही. शेलार रझा अकादमीच्या कार्यालयात बसून मिटींग करत असलेला फोटो माझ्याकडे आहे. त्याची चौकशी होईल, असं नवाब मलिक म्हणाले होते.
नवाब मलिकांच्या आरोपावर आशिष शेलारांनी जोरदार टोला लगावला. "माझा त्या फोटोचा आणि रझा अकादमीच्या फोटोशी काय संबंध? ही बैठक रझा अकादमीच्या कार्यालयात झालेली नाही. जुन्या कुठल्यातरी फोटोचा दाखला देऊन आजच्या दंगलीमध्ये राज्य सरकारच्या अपयशाला लपवण्याचं काम तुम्ही करू नका. तुमची खोड जर जाणार नसेल तर असे असंख्य फोटो रझा अकादमी सोबतचे आम्हाला दाखवावे लागतील. तेव्हा तुम्हाला तोंड दाखवायलाही जागा उरणार नाही", असा रोखठोक इशाराच आशिष शेलार यांनी नवाब मलिकांना दिला आहे.