अमरावती प्रकरणाची चौकशी करून श्रेष्ठींना अहवाल पाठवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 04:20 AM2018-05-27T04:20:39+5:302018-05-27T04:20:39+5:30
अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची १२८ मते असताना तेथील काँग्रेस उमेदवाराला फक्त १७ मते कशी मिळाली, तेथे पक्षाच्या ज्या नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली त्यांनी नेमके कोणाचे काम केले? याची चौकशी केली जाईल आणि त्याचा अहवाल पक्षश्रेष्ठींना पाठवण्यात येईल, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुंबई - अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची १२८ मते असताना तेथील काँग्रेस उमेदवाराला फक्त १७ मते कशी मिळाली, तेथे पक्षाच्या ज्या नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली त्यांनी नेमके कोणाचे काम केले? याची चौकशी केली जाईल आणि त्याचा अहवाल पक्षश्रेष्ठींना पाठवण्यात येईल, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
त्या ठिकाणी जे झाले ते अत्यंत दुर्दैवी होते, अशा शब्दांत त्यांनी तीव्र नाराजीही व्यक्त केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या मतदारसंघाची जबाबदारी पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि उपसभापती माणिकराव ठाकरे आणि आ. यशोमती ठाकूर यांच्यावर देण्यात आली होती. आपण नेमकी कोणाची चौकशी करणार? असा सवाल पत्रकारांनी विचारला असता खा. चव्हाण म्हणाले, नावे घेण्याची गरज नाही, कोणावर जबाबदारी होती हे सगळ्यांना माहिती आहे. काँग्रेस नेत्यांच्या घरात भाजपाच्या नेत्यांनी बैठका घेतल्या व अर्थपूर्ण व्यवहार केले हे खरे आहे का? असे विचारले असता खा. चव्हाण म्हणाले, भाजपाने सर्वत्र लक्ष्मीदर्शनाचा सपाटा लावला आहे. वारेमाप पैसा देणे सुरू केले आहे. जे लोक पैशांनी बधत नाहीत त्यांना चौकशांची, धमक्यांची भीती दाखवून महाराष्टÑात अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण सुरू केले आहे. यामुळे आपण महाराष्टÑात वाईट प्रथा पाडत आहोत याचेही भान त्यांना राहिलेले नाही.
अमरावतीत जे झाले त्याची पक्ष पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली असून याची चौकशी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.