मुंबई-“मंगळागौर" म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीतला एक हळवा धागा. वर्सोव्यात सर्व जाती धर्माचे नागरिक राहतात. महिलांना आपल्या कलागुणांचे दर्शन घडविता यावे यासाठी पुरेसा वाव मिळत नाही. त्यामुळे वर्सोव्यातील नव्या पिढीला आपली परंपरा समजावी, जुने खेळ आजच्या पिढीला समजावेत यासाठी वर्सोवा विधानसभा क्षेत्राच्या भाजप आमदार व ‘ती’ फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. भारती लव्हेकर यांनी श्रावण सोहळा मंगळागौर उत्सवाचे काल रात्री शानदार आयोजन केले होते.
जोगेश्वरी पश्चिम येथील दि ग्रँड एफ एम बँक्वेट, दुसरा मजला, एस व्ही रोड, दिल्ली दरबार रेस्टॉरंटच्या वर काल रात्री रंगला ‘श्रावण सोहळा मंगळागौर उत्सव’ सुप्रसिध्द गायिका व समाजसेविका अमृता फडणवीस यांच्या सहभागा मुळे चांगलाच रंगला.यावेळी ३००० हून अधिक महिलांची उपस्थिती होती.
येथील श्रावण सोहळा मंगळागौर उत्सवात अमृता फडणवीस या मराठमोळी नववारी साडी नेसून सहभागी झाल्या होत्या.त्यांनी आमदार डॉ.भारती लव्हेकर आणि उपास्थित महिलां सोबत फुगडी घालून आणि "मी फिरते मळ्यात,नजर माझी तळ्यात,देवेंद्र सारखे रत्न पडले माझ्या गळ्यात" असा अस्सल मराठी उखाणा घेत या मंगळागौर उत्सवात त्यांच्या फुगड्या आणि उखण्याने चांगलीच रंगत आणली.तर अनेक महिलांच्या आग्रहास्तव त्यांनी सेल्फी देखिल काढल्यावर तर महिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
यावेळी अमृता फडणवीस म्हणाल्या की,आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी आयोजित येथील मंगळागौर उत्सवात महिला सुंदर फुगड्या खेळल्या. मंगळागौर एक व्यायाम प्रकार असून मानसिकदृष्टीने सुखरूप राहण्यासाठी हा खूप चांगला पर्याय आहे. नागपूरमध्ये जाऊन काही काही मतदारसंघात मी मंगळागौर कार्यक्रमांचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार डॉ.भारती लव्हेकर म्हणाल्या की, सातत्त्याने महिला सक्षमीकरण तसेच विविध आरोग्य विषयक आणि अन्य उपक्रम मी महिलांसाठी राबवत असते.रोजच्या धावपळीतून स्वतःसाठी थोडा वेळ काढून सख्यांसोबत खेळ, गाणी आणि गप्पा यांचा आनंद येथील महिलांना घेता यावा हा या मंगळागौर उत्सवाच्या आयोजना मागचा हेतू असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी माजी नगरसेवक योगीराज दाभाडकर,माजी नगरसेविका रंजना पाटील आणि इतर भाजप पदाधिकारी व उपस्थित होत्या.