लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अनंत चतुर्दशीनंतर गणरायाच्या विसर्जनाचा जल्लोष ओसरल्यावर सालाबादप्रमाणे याही वर्षी जुहू चौपाटीवर मुंबई महापालिका, दिव्याज फाउंडेशन आणि भामला फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ‘क्लिनेथॉन २.०’ ही स्वच्छता मोहीम आयोजित केली होती. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महाराष्ट्राचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यतामंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार अमित साटम, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर, अमृता फडणवीस, अभिनेते राजकुमार राव, चित्रपट क्षेत्रातील इतर मान्यवर, भामला फाउंडेशनचे प्रतिनिधी आणि पर्यावरण प्रेमी नागरिक उपस्थित होते.
शुक्रवारी सकाळी या उपक्रमाची जुहू चौपाटीवरील गेट नंबर एकपासून सुरुवात झाली. सर्वच मान्यवरांनी स्वछता मोहिमेसाठी झाडू हाती घेतला आणि इतरांनादेखील प्रोत्साहित केले. उत्सवानंतर पर्यावरण रक्षणासाठी समुद्रकिनाऱ्यावरील कचऱ्याची सफाई आणि त्याचे योग्य व्यवस्थापन आवश्यक असल्याने दरवर्षी ही मोहीम आयोजित करण्यात येते. यंदा या ठिकाणी ४६ मेट्रिक टन कचरा उचलण्यात आला. एक हजार ३५० किलो निर्माल्य संकलन करण्यात आले. अमृता फडणवीस या दिव्याज फाउंडेशनच्या माध्यमातून नेहमीच समाजकार्यासाठी पुढाकार घेत असतात. अगदी कोविड काळातदेखील या फाउंडेशनने धारावी असो किंवा कोकणातील एखादे छोटे गाव असो प्रत्येक ठिकाणी संवेदनशीलपणे आणि जबाबदारीने मदतकार्य पार पाडले आहे.