मुंबई : ‘नेकी कर दरिया में डाल’, हा देवेंद्र फडणवीस यांचा चांगला गुण आहे. पण, दान हे सत्पात्रीच असावं. काही वेळा जिथे चांगुलपणा दाखवायला नको, तिथेही ते दाखवतात. त्यांनी असं करायला नको, असा सल्ला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘होम मिनिस्टर’ अमृता फडणवीस यांनी दिला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख असलेल्या उद्धव ठाकरेंनी लवकरच महाराष्ट्राचे खरे प्रमुख होण्याचा प्रयत्न करावा, अशी टिप्पणीही त्यांनी केली.‘लोकमत’च्या ‘फेस टू फेस’ कार्यक्रमात वरिष्ठ साहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी अमृता यांच्याशी संवाद साधला. आई-वडील डॉक्टर असलेल्या, राजकारणाशी संबंध नसलेल्या घरातून येऊन यशस्वी बँकर ते मुख्यमंत्र्यांची पत्नी आणि आता सामाजिक कार्यकर्ती, हा आपला प्रवास अमृता यांनी उलगडला.सायन्स चांगलं होतं, पण डॉक्टरकी हा काही आपला प्रांत नाही, हे लक्षात आलं होतं. त्यामुळे कॉमर्स निवडलं. त्याचा फायदा म्हणजे, मला गाण्याकडे आणि टेनिसकडेही लक्ष देता आलं. त्यानंतर, ॲक्सिस बँकेत नोकरी लागली, असे त्या म्हणाल्या.
मला ढोंगीपणा जमत नाहीस्त्री-समानतेचा विचार लहानपणापासून मनात रुजला होता. जडणघडणही तशीच झाली. मी एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. जशी आहे तशीच राहणार. ढोंगीपणा मला जमत नाही. मी जी मतं मांडते, ती माझी मतं असतात. मला ट्रोल करणाऱ्यांची दया येते. देव त्यांना सद्बुध्दी देवो, अशी मार्मिक टिप्पणीही त्यांनी केली.